
स्थैर्य, कोरेगाव, दि. २२: आकुर्ली (पनवेल) येथील एका महिलेच्या खून प्रकरणाशी संबंधित फरार असलेल्या व कोरेगाव परिसरातील एका फार्म हाऊसमध्ये लपून बसलेल्या चौघा संशयितांना कोरेगाव पोलिसांच्या मदतीने पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलिसांकडून माहिती मिळताच त्यांचे पथक दाखल होण्याच्या आतच कोरेगाव पोलिसांनी ’त्या’ फार्म हाऊसवर तत्काळ छापा घातल्याने संशयितांना हालचाली करण्यास वावच राहिला नाही आणि ते अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र रामा ठाकूर, अक्षय संतोष पांचाळ, शशिकांत लक्ष्मण पाटील (तिघेही रा. कोप्रोली, पनवेल), निलेश भरत फडके (रा. नेरे, पनवेल) अशी संशयितांची नावे आहेत.
मोरबे (ता. पनवेल) गावाच्या हद्दीतील मोरबे धरणाच्या जलाशयामध्ये रस्सीने व तारेने एका 48 किलो वजनाच्या सिमेंटच्या पोलभोवती समांतर गुंडाळून बांधलेल्या स्थितीत अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाच्या एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे बुधवारी (ता. 16) सकाळी साडेआठच्या सुमारास निदर्शनास आले होते. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिस निरिक्षक अशोक राजपूत यांनी तपास सुरू केला. मृतदेह ओळखण्याच्या स्थितीत नव्हता; परंतु मृत महिलेच्या एका हातातील बांगड्या व गोंदलेल्या चिन्हावरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आणि आकुर्ली (पनवेल) येथील एका 27 वर्षे वयाच्या महिलेचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. या महिलेचे कोप्रोली गाव येथे राहणार्या एका युवकाशी अनैतिक संबंध होते. त्याने संबंधित महिलेकडून घेतलेल्या पैशांवरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते.
या वादातूनच त्याने साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याची व गुन्हा दाखल झाल्यापासून तो गावातून पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुख्य संशयित हा साथीदारांसमवेत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव परिसरात फिरत असून, संशयितांसोबत मृत महिलेची लहान मुलगी देखील असल्याचे समजताच पनवेल पोलिसांनी ही माहिती कोरेगाव पोलिसांना कळवली. त्यानंतर कोरेगावचे पोलिस निरिक्षक सुनिल गोडसे, उपनिरिक्षक विशाल कदम, सहायक फौजदार प्रल्हाद पाटोळे, कॉन्स्टेबल किशोर भोसले, अजित पिंगळे, प्रशांत लोहार यांनी शोध घेऊन कोरेगाव परिसरातील एका फार्म हाऊसमध्ये लपून बसलेल्या चौघा संशयितांना शुक्रवारी (ता. 18) ताब्यात घेतले आणि पनवेल पोलिसांचे तपास पथक कोरेगावात दाखल होताच चौघांनाही या पथकाच्या स्वाधीन केले. त्यांनंतर संशयितांना पनवेल येथे नेऊन चौकशी केली असता, गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर चौघांनाही अटक करण्यात आली. त्यांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, त्यांच्यासमवेत मृत महिलेची सात वर्षांची मुलगी देखील मिळून आली. तिच्याबाबत पनवेल (रायगड) येथील बाल कल्याण अधिकार्यांकडून आदेश प्राप्त करून घेऊन तिला सुरक्षिततेसाठी बालगृहात ठेवण्यात आले आहे.