दैनिक स्थैर्य । दि. ३१ जानेवारी २०२३ । मुंबई । बौद्धजन सेवा संघ, मुंबई चे अध्यक्ष, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७६१ मिरा रोड या शाखेचे माजी चिटणीस, मिरा भाईंदर बौद्धजन पंचायत समिती गट क्र. ३३ चे गटप्रतिनिधी, बौद्धजन पंचायत समिती, परेल चे अर्थ समिती सचिव, सामाजिक कार्यकर्ते, मौजे चाफे तालुका रत्नागिरी या गावचे सुपुत्र विलास जाधव यांचे सुपुत्र पंकज विलास जाधव यांची भौतिक शास्त्रातील मॉलिक्युलर बायो फिजिक्स या विषयावर संशोधन करण्यासाठी अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटी येथे शास्त्रज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे.
पंकज जाधव यांनी मोठ्या जिद्दीने आपले शिक्षण अथक परिश्रम घेत पूर्ण केले व आज जागतिक स्तरावर उच्च स्थान प्राप्त केले त्यानिमित्ताने बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७६१ व संबोधी महिला मंडळ मिरा रोड यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत व संलग्न समित्यांचे गटप्रतिनिधी, संबोधी महिला मंडळाच्या सदस्या यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, सदर प्रसंगी पंकज जाधव याचे कौतुक करताना “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जे कोणी प्राशन करेल तो गुरगूरल्या शिवाय राहणार नाही’ या वाक्यावर तंतोतंत खरे उतरत पंकज जाधव यांनी अथक परिश्रम घेत आपले उच्चशिक्षण पूर्ण करून तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पथपदावर पुढे जात आज अमेरिकेतील नामवंत युनिव्हर्सिटीत भारताचे नाव झळकवले आहे हे अभिमानास्पद आहे, शिक्षण हा नेहमीच पंचायत समितीचे हृदय स्थानी असल्याने शिक्षणासाठी समिती नेहमीच आग्रही व अग्रणी राहते, पंकजला मिळालेले यश त्यातीलच एक भाग आहे, त्याच्या पुढील वाटचालीस आम्हा सर्वांच्या शुभेच्छा” असे गौरवोद्गार सभापती आनंदराज आंबेडकर यांनी काढले.
सदर प्रसंगी उपस्थितांनी पंकज जाधव यास पुढील वाटचालीकरता मंगल कामना दिल्या त्यावेळी पंकज जाधव यांची आई वीणा विलास जाधव व वडील विलास तानू जाधव यांना आपल्या मुलाचे कोडकौतुक पाहून भरून आले होते त्यानी मूक भावनेने सर्वांचे आभार मानले, सरतेशेवटी शाखा क्र. ७६१ चे चिटणीस मंगेश सावंत यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.