
दैनिक स्थैर्य । 16 जून 2025 । सातारा । महाबळेश्वर तालुका हा स्ट्रॉबेरीमुळे जगभर प्रसिद्ध आहे. त्यातच पुस्तकाचे गाव, गुलाबाचे गाव अन् मधाचे गाव अशी ओळख निर्माण झालेली गावे तालुक्यात आहेत. आता नाचणीचे गाव म्हणून पांगारी हे गाव उदयास येणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागामार्फत नाचणी शेतीला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम पांगारी (ता. महाबळेश्वर) गावाने घेतलेला आहे. पांगारी ’नाचणीचे नमुना गाव’ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. येथे नाचणी शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात नाचणी बियाणे व नाचणीच्या शेतीसाठी आवश्यक खतांचे वाटप शेतकर्यांना करण्यात आले.
यावेळी कृषी विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, डॉ. राजेंद्र कदम, डॉ. महेश बाबर, डॉ. संग्राम पायल, डॉ. मुकेश भेडारकर, भीमराव राऊत त्यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कृषी सहाय्यक संतोष जगताप म्हणाले, महाबळेश्वर तालुक्यामध्ये दरवर्षी दहा लाख ते पंधरा लाख पर्यटक भेटी देत असतात. याठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात निर्माण होणारे जांभूळ, स्ट्रॉबेरी, मलबेरी, राजबेरी अशा प्रकारांच्या फळांची शेती केली जाते. त्यातल्या त्यात स्ट्रॉबेरीची शेती चांगल्या प्रकारे केली जाते. स्ट्रॉबेरी या पिकावर सर्वांनी अवलंबून न राहता पर्यायी शेती करणे गरजेचे आहे. यासाठी पांगारी गावाने नाचणीचे उत्पादनकरण्याचा संकल्प केला आहे. हे गाव नाचणीचे गाव म्हणून कसे विकसित होईल, याकडे गावाची वाटचाल सुरू आहे.स्ट्रॉबेरीबरोबर नाचणीचे पीक घेतल्यामुळे जमिनीची धूप कमी प्रमाणात होईल. या पिकाला कमी प्रमाणात खते लागत असल्यामुळे शेतकर्यांचा खर्च कमी प्रमाणात होऊ शकतो. नाचणी या पिकासाठी वातावरणातील बदलाचा फारसा फरक पडत नाही.
यावेळी शेतकर्यांना सेंद्रिय खते व नाचणी बियांचे वाटप करण्यात आले. पांगारीचे सरपंच संदीप पांगारे, सर्जेराव पांगारे, जाणू पांगारे, महेंद्र पांगारे व शेतकरी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.या उपक्रमामुळे पांगारी हे गाव राज्यातील आदर्श नाचणी विशेष ग्राम म्हणून ओळखले जाईल. शाश्वत शेती, पोषणा आहार व ग्राम विकासाला नवी दिशा मिळेल व याचबरोबर नाचणीबरोबर इतर उत्पादनेही घेता येऊ शकतात.
स्ट्रॉबेरी या पिकाबरोबर पर्यायी पीक म्हणून नाचणीकडे आता हे गाव पाहात आहे. नाचणीची इतर उत्पादने निर्माण करून त्याची विक्री करण्याचा गावकर्यांचा मानस आहे. यामुळे गावातील शेतीला चांगले दिवस येतील, यात काही शंका नाही.
– महेंद्र पांगारे.