दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य नृत्यकलेला समर्पित करताना भारतीय शास्त्रीय नृत्य अधिक लोकाभिमुख केले. अभिजात शास्त्रीय नृत्याचे ते आंतरराष्ट्रीय राजदूत होते. बिरजू महाराज प्रयोगशील होते व अनेकदा त्यांनी नवतेचा अंगिकार केला. संगीत व तबल्याची विशेष जाण असलेल्या पं. बिरजू महाराजांचा महाराष्ट्राशी घनिष्ठ स्नेह होता. अनेक शिष्योत्तम घडवून त्यांनी आपले ज्ञान मुक्तपणे वाटले व गुरुसेवा केली. पंडित बिरजू महाराज यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या शिष्यपरिवार तसेच कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.