स्थैर्य, नवी दिल्ली, दि. ०९: पांडुरंगाच्या भक्ती प्रेमाने नटलेला ‘वारकरी’ व वारकऱ्यांच्या भाव दर्शनाने नटलेला ‘पांडुरंग’ असे महाराष्ट्राच्या जनविश्वाचे आनंददायी दर्शन, हजार वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूर वारीत घडते, असे मत संत साहित्य व लोकवाङ्मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी आज व्यक्त केले.
“वारी : स्वरूप आणि परंपरा” या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे २२ वे पुष्प गुंफताना डॉ देखणे बोलत होते.
संतांनी वैश्विक मानवतावादाची शिकवण दिली असून या मानवतेचे सुंदर दर्शन पंढरपूरच्या वारीत घडते. वारीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या अनुभुतीचा मोगरा दरवळतो, तुकाराम महाराजांच्या भक्तीच्या खुणा डोकावतात, समर्थ रामदासांची लोकभ्रमंती अनुभवायला येते तशी संत नामदेवांची लडीवाळ प्रिती ठायी-ठायी अनुवास येते तसेच संत एकनाथांच्या सर्व लोकभूमिका आपल्याशी बोलत असतात. ‘अंगाचेनी सुंदरपणे, लेणिया अंगची होय लेणे, तेथ अलंकारिले कवण कवणे, निर्वचना’ या ज्ञानेश्वरीतील ओवीप्रमाणे वारकरी आणि पांडुरंग या दोघांमुळे वारीमध्ये जनविश्वाचे आनंददायी दर्शन अनुभवास येते, असे डॉ. देखणे म्हणाले.
वारी : एक सांस्कृतिक प्रवाह
‘वारी’ हा महाराष्ट्राच्या लोकजीवनाला वळण देणारा एक सांस्कृतिक प्रवाह आहे. ‘होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी …’ या संतोक्तीप्रमाणे ज्येष्ठ महिन्याच्या उत्तरार्धातच महाराष्ट्राच्या गावो-गावातून भक्तांचे ढग गोळा व्हायला लागतात. भक्तीचा वारा वाहायला लागतो आणि पंढरपुरात व महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये नाम संकिर्तनाचा पाऊस पडतो त्याने संपूर्ण महाराष्ट्र चिंब भिजून जातो. पुढे भक्तीचा प्रवाह पंढरपुरी पांडुरंगाशी एकरुप होतो, असे डॉ. देखणे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या लोकजीवनात आणि लोकाचारामध्ये पांडुरंगाचे स्थान मोठे आहे. पांडुरग हा येथील लोकजीवनाचा मोठा आधारस्तंभ असून तो लोकदेव असल्याचे डॉ. देखणे यांनी सांगितले. साने गुरुजींनी ‘महाराष्ट्राच्या जनशक्तीचा मुका अध्यक्ष’ असे पांडुरंगाचे वर्णन केल्याचा संदर्भही त्यांनी यावेळी दिला. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे ज्ञानपीठ तर संत तुकाराम हे योगपीठ आहेत. तसेच प्रेमपिठाची वाटचाल म्हणजे पंढरपुरची वारी होय ‘प्रेमे जावे तया गावा, चोजवीत या विठ्ठला…’ या भावाने कपाळावर गोपिचंदन टिळा, मनामध्ये शुध्द सात्विकभाव, खांद्यावर वैष्णवांची भगवी पताका वाहत वारकरी पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ होतात असे डॉ. देखणे म्हणाले.
वारीची समृध्द पंरपरा
पंढरपूर वारीला एक हजार वर्षांची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी पंढरपुरची वारी केल्याचे संदर्भ आहेत. यानंतर महाराष्ट्रात दिंडीची परंपरा आली संत ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्याला संत नामदेवांच्या अध्यक्षतेखाली पहिली दिंडी पंढरपुराहून आळंदीला आली. संत ज्ञानेश्वरांनी वारी केल्याचे संदर्भ आहेत. संत तुकारामांच्या घरात ४२ पिढ्यांपासून विठ्ठल भक्तीची परंपरा होती. संत तुकाराम हे ज्ञानेश्वरांच्या पादुका घेवून आळंदीला जात व मग संकीर्तन करत पंढरपूरची वारीत करत.
तुकोबानंतर त्यांच्या बंधुनी काही दिवस ही परंपरा चालविली. पुढे तुकारामांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी पंढरपुरच्या वारीला पालखी सोहळ्याचे स्वरूप दिले. त्यांनी पालखी तयार केली त्यात तुकोबाच्या पादुका घेवून आळंदीला जात व तेथून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका घेवून पंढरपुरला जात, पंढरपुरात प्रल्हाद महाराज त्यांच्या भेटीला यायचे अशीही परंपरा. १६८० ते १८३५ पर्यंत हा संयुक्त पालखी सोहळा सुरु होता. १८३५ मध्ये हैबतबाबा हारफळकर पवार यांनी या पालखीला सोहळ्याचे स्वरूप दिले. आजही वारीत भजनी मालिकाच म्हटली जाते.
वारी सोहळा हा लष्करी शिस्तीचा आध्यात्मिक आविष्कार
ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांकडे सरदार असणाऱ्या हैबतबाबांनी अन्य सरदारांची मदत घेवून वारीला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले. लष्कर पध्दतीने ही वारी सुरु केली. त्यांनी या सोहळ्याला शिस्त दिली. अभंग म्हणण्यात, चालण्यात, वागण्यात, जेवनाच्या पंगतीला वारीत शिस्त आहे. गावोगावीच्या दिंड्या संतांच्या पालख्यांमध्ये एकत्र येतात हा पालखी सोहळा पुढे वारी सोहळा होतो. आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी, देहूहून संत तुकारामांची पालखी, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अशा शंभर पालख्या या सोहळ्यात सहभागी होतात.
प्रार्थना समाजाचे प्रणेते न्यायमुर्ती रानडे यांनी वारी विषयक त्यांचे टिपण लिहून ठेवले असून पंढरपुरच्या वारी सोहळ्यात संत कबीरांची पालखी काशीहून येत असल्याची नोंद त्यांनी केली आहे. कबीरांच्या पालखीची ही परंपरा शंभर वर्ष चालली. कालांतराने ही पालखी येणे बंद झाली आता पंढरपुरच्या वारी सोहळ्यात सर्व भगव्या पताकांमध्ये पांढऱ्या रंगाची एकच पताका कबीरांची पताका म्हणून सहभागी होत असते असेही डॉ देखणे यांनी सांगितले.
वारीचे अर्थकारण, प्रशासन, व्यवस्थापन आदी पैलु डॉ देखणे यांनी यावेळी उलगडले. वारीतील विविध मुक्काम, वारीतील रिंगण आदींवरही त्यांनी प्रकाश टाकला. महाराष्ट्राच्या जनविश्वाने नटलेल्या पंढरपूर वारीची ही परंपरा पुढेही अशीच टिकून राहिल असा विश्वास डॉ. देखणे यांनी व्यक्त केला.