स्थैर्य, फलटण, दि. ०५: कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील सर्व प्रा. शिक्षक, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी कर्मचारी प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे सुमारे २२ लाख रुपयांचा विशेष निधी उभारुन कोरोना उपचार साधने उपलब्ध करुन देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी जिल्हा परिषद/पंचायत समिती अधिकारी कर्मचारी आणि प्रा. शिक्षक संघटना प्रतिनिधींची बैठक घेऊन वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वरील तीनही घटकांनी प्रत्येकी २ हजार रुपयाप्रमाणे निधी उपलब्ध करुन दिला तर त्यातून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण अथवा उप जिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर मशीन्स उपलब्ध करुन देण्याची योजना मांडल्यानंतर सर्व संघटना प्रतिनिधींनी हा प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर तालुका पातळीवर प्रत्येक पंचायत समितीमध्ये बैठक घेऊन तेथेच प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे निधी संकलन करण्याचा निर्णय अध्यक्ष उदय कबुले यांनी घेतला, त्याप्रमाणे सर्व पंचायत समित्यांना सूचित करण्यात आले.
फलटण पंचायत समिती कार्यालयात सभापती श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकिस गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, प्रभारी गट शिक्षणाधिकारी रमेश गंबरे, फलटण तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.
फलटण पंचायत समितीमधील या बैठकीत तालुक्यातील सर्व प्रा. शिक्षक व जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे मदतनिधी देण्याचे मान्य केले. सदर निधी बुधवार दि. ५ मे अखेर केंद्रनिहाय नियोजन करुन सर्व केंद्रप्रमुख यांचेकडे तात्काळ जमा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
साधारणपणे जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी कर्मचारी आणि तालुक्यातील प्रा. शिक्षक एकूण संख्या ११०० असून प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे २२ लाख रुपये जमा होतील अशी अपेक्षा आहे. या जमा रकमेतून तालुक्यातील कोरोना उपचारासाठी आवश्यक साधने सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत योग्य निर्णय सर्वसंमतीने घेण्यात येणार आहे.
गेल्या सुमारे दीड वर्षाच्या कालावधीत तालुक्यातील सुमारे ९०० प्रा. शिक्षकांनी कोविड मदतीसाठी मोठे योगदान दिले आहे. प्रामुख्याने गतवर्षी प्रा. शिक्षकांनी शासनाच्या निर्देशानुसार एक दिवसाचा पगार १८ लाख रुपये, त्यानंतर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे ४.५ लाख रुपये केंद्र स्तरावर गरजुंना जीवनावश्यक वस्तू किट वाटप, त्यानंतर मध्यंतरी २ लाख ८१ हजार रुपये आणि आता प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे १८ लाख रुपये असे प्रा. शिक्षकांनी एकूण सुमारे ४३ लाख ३१ हजार रुपये उपलब्ध करुन दिले आहेत, २ लाख ८१ हजार रुपयापैकी ८१ हजार रुपये जाधववाडी येथील समाज कल्याण खात्याच्या विद्यार्थी वसतीगृहातील कोरोना केअर सेंटर मधील ऑक्सिजन पाईप व फिटिंग साठी दिले असून २ लाख रुपये शिल्लक असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती २०० अधिकारी कर्मचाऱ्यांनीही प्रा. शिक्षकांप्रमाणे मदत निधी प्रत्येक वेळी उपलब्ध करुन दिल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
बुधवार दि. ५ मे रोजी फलटण पंचायत समिती कार्यालयात पुन्हा बैठक घेऊन जमलेल्या रकमेचा आढावा व विनियोग सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांच्या समवेत सर्व कर्मचारी प्रा. शिक्षक संघटनांचे पदाधिकारी एकत्र बसून करतील तरी सर्व संबंधीतांनी प्रत्येकी २ हजार रुपये त्वरित जमा करुन सहकार्य करावे असे आवाहन सभापती श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर आणि गट विकास अधिकारी डॉ.सौ. अमिता गावडे पवार यांनी केले आहे.