दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२१ । फलटण । आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी धावणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. धावण्याने आपल्या हृदयाचे व फुफुसाचे आरोग्य सुधारते, शरीर नेहमी फिट राहते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते. वजन कमी होण्यास मदत होते, त्यामुळे सर्वांनी धावण्याचा व्यायाम जरूर करावा असे सांगतानाच दिनांक १९ डिसेंबर रोजी फलटण येथे होणाऱ्या जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेमध्ये, मी धावणार आहे, तुम्हीही धावा, असा संदेश पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी नागरिकांना दिला आहे.
फलटण येथे दि. १९ रोजी आयोजित केलेल्या, जिल्हा क्रॉसकंट्री निवड स्पर्धेचे कॅम्पेनिंग करताना, पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे बोलत होते. याप्रसंगी फलटण तालुका असोसिएशनचे तायाप्पा शेंडगे, दैनिक गंधवार्ताचे संपादक अॅड. रोहित अहिवळे, सचिन धुमाळ, राज जाधव, डी. एन. जाधव, ए. बी. सुळ, धीरज कचरे, गंगतिरे उपस्थित होते.
जिल्हा क्रॉसकंट्री निवड स्पर्धेत ओपन गटामध्ये पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर हे १० किलोमीटर अंतर धावणार आहेत. राजकीय इतिहासामध्ये पंचायत समितीच्या सभापती यांनी १० किलोमीटर रनिंगच्या स्पर्धेत सहभागी होऊन, ती पूर्ण करण्याचा संकल्प केला असल्याची ही पहिलीच वेळ आहे. श्रीमंत विश्वजितराजे यांचा क्रॉसकंट्री स्पर्धेतील सहभाग सध्या युवा वर्गात चर्चेचा विषय बनला असून, श्रीमंत विश्वजीतराजे यांच्या धावण्याने इन्स्पायर होऊन, अनेकांनी आपणही धावुयात असा संकल्प केला आहे.
सातारा जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशन व फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन आणि फलटण जिमखाना, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रॉसकंट्री निवड स्पर्धा २०२१ – २२ चे आयोजन दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी, सजाई गार्डन, गिरवी नाका नजीक, फलटण जि. सातारा येथे करण्यात आले आहे. स्पर्धेचा शुभारंभ महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.
याप्रसंगी नगराध्यक्षा सौ. निता मिलिंद नेवसे, नगरसेवक, नागरसेविका उपस्थित राहणार आहेत. तर जिल्हा क्रॉसकंट्री निवड स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ स्पर्धा संपल्यानंतर, त्याच ठिकाणी सकाळी ९ वाजता फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण, पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, जाधववाडी सरपंच सीमा आबाजी गायकवाड, व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे.