
दैनिक स्थैर्य । दि.०८ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य मकरंद उर्फ मारुती मोटे हे मासिक सभेला सलग सहा महिने अनुपस्थित राहिल्याबद्दल पुणे विभागीय कार्यालयातील अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी अपात्र ठरविले आहे. याप्रकरणी नायगाव येथील मंगेश नेवसे यांनी पुणे विभागीय आयुक्त याठिकाणी तक्रार दाखल केली होती. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे.
खंडाळा पंचायत समितीवर आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ३, काँग्रेस १ व अपक्ष २ असे संख्याबळ आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र तांबे, अश्विनी पवार, मकरंद मोटे, काँग्रेसच्या उपसभापती वंदना धायगुडे-पाटील तर अपक्ष म्हणून चंद्रकांत यादव, शोभा जाधव हे सदस्य म्हणून कार्यरत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद मोटे हे खंडाळा पंचायत समितीचे सभापतीपदी कार्यरत असताना एका गंभीर गुन्ह्यामध्ये कारागृहामध्ये असल्याने खंडाळा पंचायत समितीच्या मासिक सभेला सलग सहा महिने अनुपस्थित राहिल्याने त्यांना अपात्र करण्याची मागणी व तक्रार नायगाव येथील मंगेश नेवसे यांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. त्यानुसार पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त तथा अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्यासमोर सुनावणी होती. याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. यावेळी अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद मोटे यांना खंडाळा पंचायत समिती सदस्य म्हणून अपात्र ठरविण्याचा आदेश दिल्याने खंडाळा तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खंडाळा पंचायत समितीमधील संख्याबळ एकाने कमी होत २ सदस्य संख्या राहिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्कातंत्र दिल्यानंतर जॉईंट किलर ठरलेले खंडाळा पंचायत समिती सदस्य चंद्रकांत यादव काय भूमिका घेतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे.