
दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२२ । अकलूज । श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामाला सातारा व सोलापूर जिल्ह्यात आता गती आली आहे . पुणे जिल्ह्यात मात्र काम मंद गतीने सुरु आहे . या गतीनेच कामे होणार असतील तर वारकऱ्यांची वाट सुखकर कशी होणार असा सवाल संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील यांनी केला आहे . पालखी सोहळा प्रमुख , प्रमुख विश्वस्थ , मानकरी व अधिकाऱ्यांनी शनिवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचा धावता दौरा केला.
आषाढी वारी आता केवळ महिन्यावर येवून ठेपल्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी करण्यात येत आहे . चैत्री वारीपासून आज अखेर पाच दौरे करण्यात आले आहेत. सातारा व सोलापूर जिल्ह्यातील काम अधिकारी व ठेकेदार यांच्या अथक परिश्रमामुळे प्रगतीपथावर आहे . परंतु पुणे जिल्ह्यातील सासवड येथील कऱ्हा नदीवरील पुल मात्र निधी अभावी रखडला असल्याचे सांगण्यात येते . गेली दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी पायी वारी सोहळा निघाला नाही . परंतु यंदा या सोहळ्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे . दिंडीप्रमुखांकडून तशी माहिती मिळत आहे . त्यामुळे यंदा आषाढी वारी १४ लाखांचा आकडा पार करेल असा विश्वास व्यक्त करुन वारीतील वारकऱ्यांची लक्षणीय वाढ लक्षात घेता पालखी मार्गाची कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे सोहळा प्रमुख ॲड . विकास ढगे पाटील यांनी सांगितले.
धर्मपुरी ते वाखरी हा सुमारे ७० किलोमीटरचा पालखी मार्ग पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या वतीने जे. एम . म्हात्रे व एस . एम . अवताडे यांच्या कंपनीला काम दिले गेले आहे . या दोन्ही कंपन्यांनी आता कामाला गती दिली आहे .
धर्मपुरी ते खुडूस पर्यंतचे काम जे . एम . म्हात्रे या कंपनीकडे तर खुडूस ते वाखरी पर्यंतचे काम एस . एम . अवताडे या कंपनीकडे आहे . या संपूर्ण पालखी मार्गाची पहाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई , सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील , व्यवस्थापक माऊली वीर , मालक बाळासाहेब आरफळकर , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माऊली जळगावकर , बाळासाहेब चोपदार , दिंडी प्रमुख भाऊसाहेब गोसावी , सचिव मारुती कोकाटे , एकनाथ जळगावकर , बाळासाहेब उखळीकर , पर्यवेक्षक ज्ञानेश्वर पोंदे , प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर , तहसीलदार जगदीश निंबाळकर , नायब तहसीलदार मनोज स्तोत्रे , उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे , विक्रम कदम , प्रकल्प संचालक केशव घोडके , सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील जाधव , जे . एम . म्हात्रे इंफ्रा प्रा . लि . चे जनरल मॅनेजर दीपकसिंह पाटणकर , एस . एम . अवताडे कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अभिजीत कुलकर्णी , सुरज शहा यांच्यासह अधिकारी व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
धर्मपुरी पालखी तळ , पुरंदावडे येथील अश्वांचे गोल रिंगणाची जागा , वेळापूर धाव्याजवळील भारुडाची जागा व पालखी ठेवण्याचा कट्टा तसेच टप्पा येथील बंधू भेटीच्या सोहळ्याची जागा ही व्यवस्थित करुन देण्याची मागणी तसेच पालखी तळाच्या परिसरातील अतिक्रमणे त्वरीत काढून टाकावीत अशी मागणी सोहळा प्रमुखांनी केली . त्यावर प्रकल्प संचालक केशव घोडके यांनी संबंधित ठेकेदारांना याबाबत सूचना दिल्या . ही कामे सोमवार पासून सुरु केली जातील व सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी पूर्ण होतील असे ते म्हणाले . पालखी तळावरील अतिक्रमणे त्वरीत दूर केली जातील असे प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांनी सांगितले .
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने पालखी तळावर लावण्यासाठी सुमारे दोन मिटर लांबीची वारकरी पताका भेट देण्यात आली . परतीच्या प्रवासात टप्पा येथील सकाळची न्याहरीची जागा ही उड्डाणपूल बांधल्याने टप्पा चौकात घेण्यात आली . या निर्णयाचे देशमुख परिवारासह गावकऱ्यांनी स्वागत केले.