
दैनिक स्थैर्य । दि. १९ जानेवारी २०२३ । फलटण । आळंदी – पंढरपूर पालखी महामार्गासोबतच फलटण शहरामधून जो पालखी मार्ग मार्गस्थ होत आहे; तो मार्ग सुद्धा व्यवस्थित करून त्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी फलटण शहरामधून जाणारा पालखी मार्गाचे काम सुद्धा प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचे आश्वासन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा फलटण शहरांमधून मार्गस्थ होत असतो. आळंदी – पंढरपूर पालखी महामार्गाचे काम सध्या फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. यामध्ये फलटण शहरामधून जाणाऱ्या पालखी मार्ग समाविष्ट नव्हता; परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरामधून सुद्धा जाणाऱ्या पालखी मार्ग करून त्याचे सुशोभीकरण सुद्धा करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या मागणीस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवलेला आहे.
फलटण शहरामधून मलठण – उमरेश्वर चौक – पाच बत्ती चौक – श्रीराम मंदिर – गजानन चौक श्रीमंत मालोजीराजे पुतळा – गिरवी नाका या मार्गावरून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा मार्गस्थ होत असतो. आळंदी – पंढरपूर हा पालखी महामार्ग लवकरच साकार होत आहे. यामध्ये फलटण शहराच्या बाहेरून पालखी महामार्ग जात असल्याने शहरामधील जो पालखी मार्ग आहे; तो मार्ग प्रलंबितच राहत होता. यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन सदरील शहरातून जाणारा मार्ग सुद्धा पालखी महामार्गामध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी केली त्यास नितीन गडकरी यांनी मान्यता देत लवकरच यावर कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.
फलटण शहराला ऐतिहासिक असा वारसा आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली फलटण ही नगरी आहे. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे फलटण हे आजोळ आहे. श्री चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने फलटण नगरी ही पावन झालेली आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून फलटणची ओळख आहे. श्री संत हरीबुवा महाराज व श्री संत उपळेकर महाराज यांचे वास्तव्य सुद्धा फलटणमध्ये मोठा काळ होते, अशा या फलटण नगरी मधून जात असलेला पालखी मार्गाचे काम आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्गामधूनच करण्यात यावे, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली होती.