स्थैर्य , दि. २८: पाकिस्तानच्या सागरी हद्दीमध्ये शिरकाव केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने भारताच्या 17 मच्छिमारांना अटक केली असून त्यांच्या 3 बोटी ताब्यात घेतल्या आहेत. शुक्रवारी या मच्छिमारांना अटक करण्यात आली आणि त्यांना शनिवारी न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले, असे पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले.
पाकिस्तानी सागरी हद्दीत असल्याने मागे फिरावे असा इशारा या मच्छिमारांना देण्यात आला होता. मात्र या मच्छिमारांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पाकिस्तानी बोटीने या मच्छिमारांना अटक केली. त्यावेळी ते पाकिस्तानच्या सागरी हद्दीमध्ये 10-15 सागरी मैल आतमध्ये, भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सागरी सीमेवरील सर क्रीक खाडीजवळ होते, असे या प्रवक्त्याने सांगितले. अटक केल्यानंतर भारतीय मच्छिमारांना मलीर किंवा लोंधी तुरुंगात पाठवण्यात आले असावे, असा अंदाज आहे.
यापूर्वी वर्षभरापूर्वी भारताच्या 23 मच्छिमारांना पाकिस्तानने अटक केली होती आणि त्यांच्या मासेमारीच्या चार बोटी जप्त केल्या गेल्या होत्या. अरबी समुद्रामध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सागरी सीमा स्पष्ट नाही. तसेच आपले समुद्रातील नेमके ठिकाण ओळखण्यासाठी आवश्यक असलेली आधुनिक उपकरणे मच्छिमारांच्या बोटींमध्ये नसल्याने अनेकवेळा दोन्ही देशांचे मच्छिमार एकमेकांच्या सागरी हद्दींमध्ये शिरकाव करत असतात. या मच्छिमारांना दुसऱ्या देशाकडून अटक केली जात असते. अशा मच्छिमारांना दुसऱ्या देशातील तुरुंगात अनेक महिने काढावे लागत असतात.