
दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२१ । सातारा । एखाद्या गावाचा विकास करावा याचा आदर्श राज्याला घालून दिलेले ग्रामविकासाचे प्रणेते व हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद, मुंबई, सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटिज पुणे व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पवार यांचा सत्कार सोहळा मंगळवार दि. 30 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
साताऱ्यानजिक जकातवाडीत होणाऱया या कार्यक्रमास सरपंच परिषदेचे राज्याचे प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार असून यावेळी सातारा जिल्हय़ातील सरपंचांचा मेळावा व करोना प्रतिबंधक जनजागृती शिबिर होणार असल्याचे या समारंभाचे निमंत्रक व सरपंच परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष नितीनकाका पाटील यांनी सांगितले.
या सत्कार सोहळय़ास सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे-पाटील, उपाध्यक्ष अनिल गिते, सरचिटणीस ऍड. विकास जाधव, महिला अध्यक्षा राणीताई पाटील, विश्वस्त आनंदराव जाधव, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोफळे, सचिव संजय शेलार, सातारा जिल्हा उपाध्यक्ष अरुण कापसे, महिला उपाध्यक्ष आशा जाधव, सचिव शत्रुघ्न धनावडे, समन्यवक महेश गाडे, अरुण जाधव, संपर्कप्रमुख चंद्रकांत सणस, सुनिता पाटणे, सातारा तालुकाध्यक्ष ऍड. अनिल सोनमळे, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, राहूल डांगे, सचिव हणमंत देवरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी जिल्हय़ातील सर्व गावांचे सरपंच उपस्थित राहणार असून कोरोना प्रतिबंधक जनजागृती शिबिरात पोपटराव पवार यांचे खास मार्गदर्शनही लाभणार यावेळी सर्व सरपंचांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नितीनकाका पाटील यांनी केले आहे.