
स्थैर्य, सातारा, दि. 7 नोव्हेंबर : भोर येथील फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ आणि समविचारी संस्था संघटना यांच्या विद्यमाने पुढील महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या अकरा व्या फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत पद्मश्री लक्ष्मण माने यांची निवड करण्यात आली आहे. लक्ष्मण माने यांचे सामाजिक, राजकीय व साहित्यिक विचार सर्वसमावेशक परंपरेचे प्रतिक आहे. ’उपरा’कार म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या या आत्मकथनाचे हिंदी, इंग्रजी, तमिळ, गुजराती, मल्याळम व फ्रेंच भाषांमधून भाषांतर झाले आहे.
याशिवाय त्यांच्या उध्दवस्त, क्रांतिपथ, खेळ साडेतीन टक्क्यांचा, पालावरचं जग, बंद दरवाजा, प्रकाशपुत्र, भटक्यांचं भारुड आदी कलाकृती प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लेखनातून समाजाच्या उपेक्षित वर्गाला परिवर्तन व पुरोगामीविचार चळवळीच्या प्रवाहात आणण्यासाठी चे व्यापक प्रयत्न दिसतात. भारतीय सामाजिक परिप्रेक्षात होत असलेल्या सामाजिकअन्याय, अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या बेचाळीस पोटजातींसह बौद्ध धम्माचा स्वीकार केला आहे. त्यांच्या विकासासाठी त्यांनी अनेक संस्थाची स्थापना केली व त्यातून समाजहित साधण्याचा प्रयत्न केला आहे.
1990 ते 96 या काळात ते विधान परिषदेचे सभासद राहिले आहेत. त्यांनी विविध सभा संमेलनांची अध्यक्षपदे भूषवली असून विविध पुरस्कारांचे भूषणहीते ठरलेले आहेत. त्यांच्या या निवडीमुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. या निवडीच्या वेळी संयोजन समिती च्या अध्यक्ष हसीना शेख, प्रा सुजित चव्हाण, योगेश कांबळे, योगेश सरोदे, अक्षय जाधव, अरुण डाळ, वाल्मिक कांबळे, कॉ. ज्ञानोबा घोणे, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. सुरेश गोरेगावकर, राहुल गायकवाड, संदीप जाधव प्रफुल्ल बनसोडे, नाना समगीर, पत्रकार विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

