
स्थैर्य, सातारा, दि. 15 नोव्हेंबर : रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट, सातारा व सातारकर नागरिकांतर्फे दरवर्षी ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य करणार्या आणि सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणार्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला / संस्थेला सातारा भूषण पुरस्काराने गौरविले जाते.
यावर्षीचा हा पुरस्कार पद्मभूषण जेष्ठराज भालचंद्र जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे स्वर्गीय अरुणराव गोडबोले यांच्या मासिक श्राद्ध दिनी या पुरस्काराची घोषणा ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे विश्वस्त परिवाराने केली असून लवकरच एक भव्य कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती या ट्रस्टचे विश्वस्त डॉ.अच्युत गोडबोले यांनी दिली.
स्वर्गीय अरुण गोडबोले यांनीच जोशी यांच्या नावाची निवड केल्यामुळे हा पुरस्कार आवर्जून ज्येष्ठराज जोशी यांना प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री . ज्येष्ठराज जोशी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मसूर येथे झाला असून त्यांचे शालेय शिक्षण कराड येथे पूर्ण झालेले आहे डॉक्टर जेष्ठराज जोशी यांनी डॉक्टर होमी भाभा इन्स्टिट्यूट ,मुंबई तसेच परदेशातील अनेक विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम केले आहे. 54 वर्षे संशोधन व अध्यापनाचे काम करणारे श्री .जोशी यांना सन 2014 साली पद्मभूषण पुरस्काराने भारत सरकारने गौरविलेले असून त्यांना याबरोबरच भटनागर पुरस्कार, उत्तम शिक्षक पुरस्कार आदी मान्यवर पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे त्यांची 1000 हून अधिक संशोधनावरील विशेष पब्लिकेशन ही प्रकाशित करण्यात आली असून नवीन प्रकारच्या केमिकल व औद्योगिक इंजीनियरिंग मधील संशोधनासाठी त्यांनी केलेले संशोधन व अध्यापनाचे काम खरोखरच गौरवपूर्ण असे आहे जोशी यांनी मराठी विज्ञान परिषदेसाठी विशेष योगदान दिले असून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी ही त्यांनी केलेले कार्य हे गौरवपूर्ण असे आहे अनेक नामवंत अकॅडमीचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले असून 200हून अधिक विद्यार्थी त्यांच्या शोधनिबंधांवर अभ्यास करून त्यांनीही पीएचडी ही पदवी प्राप्त केलेली आहे .आणि अनेक नवनवीन शोध श्री. जोशी यांनी लावले असून विविध प्रकारची अतिशय सुरेख अशी डिझाईन्स श्री .जोशी यांनी आत्तापर्यंत तयार केलेली आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून सातारा जिल्ह्यातील मूळ असलेल्या श्री .जोशी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
रासायनिक, अभियांत्रिकी आणि अणुविज्ञान क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून सन 2025 च्या सातारा भूषण पुरस्कारासाठी पद्मभूषण जेष्ठराज भालचंद्र जोशी यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी अनेक मान्यवरांना सदर पुरस्काराने सन्मानित केले आहे. सदर परंपरा गेली 34 वर्षे अखंडपणे चालू आहे. सन 1991 पासून ट्रस्टने सातारा भूषण पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू केला. त्यामार्फत दरवर्षी ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य करणार्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला सातारा भूषण पुरस्काराने गौरवले जाते. रोख रु. 40 हजार व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन्मानित व्यक्तीला त्या क्षेत्रातीलच व्यक्तीच्या हस्ते आणि इतर मान्यवर व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली उत्तम समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जातो. या सर्व कार्याला सातारकरानीही सदैव मोलाची साथ दिली आहे. जिल्ह्यातील तरुणानी प्रेरणा घेवून आपले कर्तुत्व घडवावे असाच यामागचा उद्देश आहे.तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,ह.भ.प. भगवानमामा कराडकर,स्वरराज छोटा गंधर्व,खा. शरद जोशी,डॉ. निळकंठराव कल्याणी,स.भ. मारुतीबुवा रामदासी,डॉ. राजेंद्र शेंडे,प्रा. शिवाजीराव भोसले,गुरुवर्य बबनराव उथळे,डॉ. रा. ना. दांडेकर,राजमाता श्री. छ. सुमित्राराजे भोसले,शाहीर साबळे,कै. डॉ. नरेंद्र दाभोलकर,ह.भ.प. बाबामहाराज सातारकर,गिरीश कुबेर,बी. जी. शिर्के,रयत शिक्षण संस्था,सविता प्रभुणे,ललिता बाबर,चित्तरंजन कोल्हटकर,अपर्णा रामतीर्थकर,यमुनाबाई वाईकर,प्रताप गंगावणे,प्रा. डॉ. यु. म. पठाण,डॉ. काटकर बंधू,सयाजी शिंदे,ह.भ.प. चारुदत्त आफळे,प्रा. डॉ. गो. पु. देशपांडे,डॉ. प्रमोद चौधरी,चेतना सिन्हा,फरोख कूपर,हणमंतराव गायकवाड,डॉ. रणजीत जगताप,डॉ. सुरेश भोसले या मान्यवरांना सदर पुरस्काराने सन्मानित केले आहे.
कै. रा. ना. तथा बन्याबापू गोडबोले हे सातार्याच्या आर्थिक, धार्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व होते. युनायटेड वेस्टर्न बैंक; आयुर्वेदीय अर्कशालाः समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड; श्रीराम मंदिर, चाफळ; श्री खिंडीतील गणपती व कुरणेश्वर देवस्थान; वेस्टर्न इंडिया ट्रस्टी कंपनी अशा अनेक संस्थांचे नेतृत्व करून त्यांनी त्या प्रगतीपथावर नेल्या. लहानपणी घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्यांना खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण करावे लागले. अनेक वेळा शारीरिक कष्टाची कामे करावी लागली. त्यामुळे आयुष्यात स्थैर्य मिळाल्यावर गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याच्या मुख्य हेतूने त्यांनी 1971 साली रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट हा ट्रस्ट स्थापन केला.
अन्य कोणाकडूनही त्यासाठी देणगी न घेता आपल्या स्वतःच्या उत्पन्नापैकी काही भाग या ट्रस्ट मध्ये घालण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. पहिल्या वर्षी रु. 500/- ची मदत देण्यात आली. ट्रस्ट फंडाची मूळ रक्कम कायम ठेऊन त्याच्या व्याजातून ही मदत दिली जाते. दरवर्षी त्यांनी व त्यांचे सुपुत्र अरुण, अशोक आणि डॉ. अच्युत यांनी परंपरा पाळून या ट्रस्टमध्ये भरघोस भर घातली. आता हा मूळ ट्रस्ट फंड एक कोटीच्या पुढे पोहोचला आहे. अशा तन्हेचा केवळ एकाच कुटुंबाचा स्वतःच्या उत्पन्नातून जनहितार्थ कार्य करणारा हा आपल्या परिसरातील बहुधा एकमेव ट्रस्ट असेल.
कै. अरुण गोडबोले हे जेष्ठ कर सल्लागार होते. त्यांनी 5 मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ’कौशिक प्रकाशन’ या त्यांच्या संस्थेमार्फत 150 पुस्तके, कॅसेटस् चे प्रकाशन झाले आहे. शिवाय त्यांची स्वतःची 36 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक सामाजिक संस्थात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. अशोक गोडबोले हे सिव्हील इंजीनिअर व कॉन्ट्रॅक्टर आहेत. डॉ. अच्युत गोडबोले बालरोगतज्ञ असून चिंतामणी नर्सिंग होम हे त्यांचे हॉस्पिटल गरीब रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. सातारा शहराचे नगराध्यक्षपद कै.रा. ना. गोडबोले यांनी 1962 साली भूषविले होते. त्यानंतर 2007 साली डॉ. अच्युत यांनी ते भूषवले आहे. या तिघांच्या पुढच्या पिढीतील उदयन, प्रदयुम्न व डॉ. चैतन्य हे त्यांच्या व्यवसायात कार्यरत असून ट्रस्टमध्ये त्या तिघानीही मोलाची भर घातलेली आहे.
त्यामुळे ही मदत वाढत वाढत आता दरवर्षी 400 विद्यार्थी व संस्था मिळून रु. चार लाखापर्यंत दिली जाते. गेल्या 54 वर्षात दिलेले एकूण शैक्षणिक मदत 60 लाखाहून जास्त आहे. गरिबीला जात नसते त्यामुळे ही मदत सर्व जाती धर्माच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दिली जाते. गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थाना मदत करणे हे ट्रस्टचे मुख्य कार्य आहे. त्याचबरोबर गरजू गरीब रुग्णानाही मदत केली जाते.याशिवाय ट्रस्टमार्फत मान्यवरांची व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद, संगीताचे कार्यक्रमही, आयोजित केले जातात. पं. प्रभाकर कारेकर हे 1975 ते 2011 अशी 36 वर्ष दरवर्षी 8 सेप्टेंबरला आपली मैफिल ट्रस्टतर्फे सातार्यात करत होते. अशा तन्हेचा बहुधा जगातील हा एकमेव उपक्रम असावा.
कै. रा. ना. तथा बन्याबापू गोडबोले यांच्या सर्व कार्यात कै. बन्याबापू यांना पत्नी सौ. मालतीबाई यांचा मोलाची साथ होती, कै. सौ. मालतीबाई यांच्या (1924- 2024) जन्मशताब्दी वर्षानिमित्त गेल्या वर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. त्या दोघांची स्मृति भावी पिढीला प्रेरणादायी ठरावी या उद्देशाने त्यांचे स्मारक (अर्ध पुतळे) व त्यांचे कार्याचे माहिती फलक असे स्मृति स्थळ श्री खिंडीतील गणपती व कुरणेश्वर देवस्थान परिसरात विकसित केले आहे.

