जिल्ह्यातील पालिका निवडणुकांचे पुन्हा पडघम; सहा जून रोजी होणार अंतिम प्रभाग रचना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ८ मे २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील पालिका निवडणुकांचे पुन्हा पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपुर, म्हसवड या आठ व मेढा नगरपंचायत अशा नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियमाप्रमाणे प्रभाग रचना राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने राज्यशासनाने करावयाची तरतूद करण्यात आली असून प्रभाग रचना संदर्भात पुढील कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार प्रभाग रचनेसाठी हरकती आणि सूचना मागवणे 14 मे पर्यंतचा कालावधी निर्धारित झाला आहे. हरकती मागवण्याचा कार्यक्रम 10 मे रोजी सुरू होणार आहे. या हरकती आणि सूचनावर 23 मे पर्यंत सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावयाची आहे. 30 जून पर्यंत हरकतींचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला पाठवायचा असून 6 जून पर्यंत अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध करून त्याला मान्यता द्यावयाची आहे. त्यानंतर प्रारुप मतदार यादी हरकती-सूचना अंतिम मतदार यादी वॉर्ड आरक्षण नगराध्यक्ष आरक्षण हे कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

प्रभाग रचना अंतिम करण्याबाबत या पूर्वीचे संबंधित आदेश अधिक्रमित करून राज्य निवडणूक आयुक्त यांनी त्यांचे अधिकार संबंधित मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना प्रदान केले आहेत. अ वर्ग असलेल्या सातारा आणि ब वर्ग असलेल्या फलटण आणि कराड नगरपालिका यांच्या अंतिम प्रभाग रचनेत राज्य निवडणूक आयोग मंजुरी देणार आहे. क वर्ग असलेल्या वाई, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी व रहिमतपूर या नगरपालिकांच्या प्रभाग रचना विभागीय आयुक्त मंजुरी देणार आहेत. सूचना व हरकतीवर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवणार आहेत.

निवडणूक आयोग निवडणुकांच्या तयारीला लागल्यामुळे जिल्ह्यात राजकीय वारे जोरात वाहू लागले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील लवकरच सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील 121 मंडल प्रमुखांची बैठक घेतली जाणार आहे. राष्ट्रवादीसुद्धा या निवडणुकांच्या अनुषंगाने तयारीत असून तयारीचा आढावा प्रदेश कार्यकारिणीच्या माध्यमातून घेतला जाणार असल्याचे सूतोवाच विधानपरिषद पक्षप्रतोद शशिकांत शिंदे यांनी केले आहे. नगरपालिका निवडणुकांचा रागरंग पाहून शिवसेनेने सुद्धा सातारा जिल्ह्यात 25 मे पासून शिव संपर्क अभियानाची घोषणा केली आहे की अभियानाच्या संपर्क प्रमुख पदी ठाण्याचे खासदार व जिल्ह्याचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची नेमणूक करण्यात आली असून संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील यांची या समितीवर वर्णी लावली जाणार असल्याची चिन्हे आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडी व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीच्या माध्यमातूनही आढावा सत्र सुरू झाले असून सातारा शहरांमध्ये गाठीभेटी च्या सत्रांना सुरुवात झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!