काळगांव परिसरात भात लावणी अंतिम टप्प्यात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १९ : धुळवाफेवरील भात पेरणी ते भात लावणी असा काहीसा क्रम काळगांव विभागातील पेरणीमध्ये आढळून येतो. काळगांव खोऱ्यात भात हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. कमी पाण्यावरील व जास्त पाण्यावरील भाताची विविध पीके घेतली जातात. ज्या ठिकाणी कमी पाणी आहे. अशा ठिकाणी धूळवाफेवरील भाताचे पीक व ज्या ठिकाणी पाणी मुबलक आहे अशा ठिकाणी भात लावणीचे बी घेण्यात येते. सध्या सर्वत्र भात लावणीचे काम युध्द पातळीवर सुरु असून अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे शेतशिवार माणसांनी गजबजून गेला आहे.

प्रतिवर्षी या विभागातील मुंबई-पुणे व अन्य ठिकाणी नोकरीस असलेला चाकरमानी या कामासाठी हमखास हजर राहतो. परंतू यंदा लाॅकडाउनमुळे हा चाकरमानी वर्ग शेतीच्या मशागतीच्या कामापासूनच शेतामध्ये व्यस्त आहे. जास्तीत जास्त वेळ शेतीमध्ये देण्याचा प्रयत्न या लोकांचा दिसून येतो. तसेच यंदा आतापर्यंत पावसाने चांगल्या पध्दतीने साथ दिल्यामुळे शेतकरी राजा देखील सुखावला आहे. निवी, कसणी व परिसरामध्ये नाचणीचे पीक देखील घेतले जाते. त्यास या भागात ‘आवटणे’ असे म्हटले जाते. भात लावणी नंतर पेरणी करण्याचा हंगाम संपला जातो असे म्हटले तरी ते वावगे ठरु नये.

उन्हाळयातील काही काळ सोडला तर या भागातील शेतकरी 12 महिने 24 तास शेतात काबाडकष्ट करत असतो. पेरणीपूर्वी शेतीची मशागत, खत टाकणे, तरवा टाकणे, त्यानंतर पेरणी, भांगलणी, कोळपण, युरिया टाकणे, पीक काढणे, मळणी करणे, संबंधित पीक घरी आणणे, जनावरांसाठी वैरण काढणे इ. कामाचे चक्र कायम सुरुच असते. या कामाच्या चक्रात येथील शेतकरी कायम गुंतलेला असतो. शेती, जनावरे आणि स्वतःचे कुटूंब हेच त्याचे विश्व असते.

धूळवाफेवरील पेरणी पूर्ण केल्यानंतर पावसाची उघडीप दिल्यामुळे भांगलणी, कोळपणी अशी कामे लोकांनी उरकली आहेत. दरम्यान, याच कालावधीत भात लावणीसाठी तरवा देखील टाकला जातो. तरवा टाकण्यापूर्वी संबंधित क्षेत्र शेतातील घाण, शेणी, पालापाचोळा टाकून पेटवले जाते. त्यानंतर त्यात भाताचे बी टाकून तरवा तयार केला जातो. भांगलणी व कोळपणीच्या दरम्यान तरव्याच्या शेजारील शेतीचा भाग नांगरला जातो त्यास ‘वाफे चिरणे’ असे म्हणतात. याच काळात भांगलणी, कोळपणीची कामेदेखील युध्द पातळीवर सुरु असतात. हे झाले की तरवा काढण्यात येतो. त्यानंतर संबंधित रानात पाणी सोडले जाते. पाणी सोडून ते पुन्हा नांगरले जाते. त्यात चिखल तयार करतात. त्यानंतर लाकडी दात असलेल्या शेती औजाराने ते शेत एकजीव केले जाते. त्यात अगोदरच्या दिवशी उपटलेल्या तरव्याची रोपे रोवली जातात. या संपूर्ण क्रियेस भात लावणी म्हणतात. सध्या ही भात लावलणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. आतापर्यंत शेतकऱ्याला हवा तास पाऊस या भागात मिळाल्याने शेतकरी देखील सुखावला आहे.

या भातलावणीमुळे भाताचे उत्पन्न देखील चांगले येते. तसेच एकवेळ भांगलणी केली तरी चालते. याशिवाय पीक काढणीच्या वेळेस देखील ते व्यवस्थित काढता येते. परंतू या भात लावणी करताना सर्वांनाच चांगली मेहनत घ्यावी लागते. या भागातील 25 टक्के पेरणी अशा पध्दतीने केली जाते. मस्करवाडी, डाकेवाडी, काळगाव, वेताळ, कुमाळ, चोरगेवाडी, करपेवाडी, धनगरवाडा, निवी व कसणी या भागात ही पध्दत सर्रास वापरली जाते.

सध्या सर्वच शिवारात भात लावणीची कामे जोमाने सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सर्व शिवारात माणसेच दिसत आहेत. पेरणीचा शेवटचा टप्पा पार करण्यात सर्वजण व्यस्त दिसत आहेत.

भात लावणीच्या या पध्दतीस आमच्याकडे रोपा लावणे असे म्हटले जाते. प्रचंड मेहनत करावी लागणारी ही प्रक्रीया आहे. परंतू या पध्दतीमुळे भाताचे उत्पन्न चांगले मिळते, त्यामुळे आम्ही पध्दत वापरतो. एका औताच्या पाठीमागे किमान 8 माणसे तरी लागतात. 2 औत धरण्यासाठी, 2 बांध धरण्यासाठी व 4 भात लागण करण्यासाठी. अजूनपर्यंत तरी या कामासाठी पयऱ्याची पध्दत आमच्याकडे आहे. यामुळे लोकांच्यातील एकेाप्याची भावना देखील दृढ होत आहे.  राजाराम डाकवे (तात्या), शेतकरी 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!