स्थैर्य, सातारा, दि.०८: कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडाला असून ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर तोडगा म्हणून आणि कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा व्हावा या उदात्त हेतूने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या महिना अखेपर्यंत प्लांट सुरु होईल आणि त्याद्वारे विविध रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा होईल, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
ऊस पुरवठादार सभासद, शेतकऱ्यांना नेहमीच उच्चतम दर देऊन राज्यातील एक आदर्श सहकारी संस्था असा नावलौकिक मिळवलेल्या अजिंक्यतारा कारखान्याने विविध उपक्रमांतून सातत्याने सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. महाराष्ट्रासह परराज्यातील पुरग्रस्थांना मदत, दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा, आपत्तीग्रस्थांसाठी मदत अशा विविध उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकीतही अग्रेसर राहणाऱ्या या कारखान्याने सध्याची गंभीर परिस्थिती ओळखून कोरोना महामारीमध्ये रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा आणि ऑक्सिजन अभावी रुग्णांची होणारी जीवघेणी हेळसांड थांबावी यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही थैमान घातले आहे. दररोज दोन हजारच्या पटीने रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही आणि बेड मिळाला तर ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि संचालक मंडळाने कारखाना कार्यस्थळावर ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
अजिंक्यतारा कारखान्यावरील या प्लांटमध्ये हवेतील ऑक्सिजन गोळा करून तो सिलिंडरमध्ये भरला जाणार आहे. या प्लांटमध्ये २४ तासांत प्रत्येकी १२ किलो ऑक्सिजनचे ९० जम्बो सिलिंडर भरले जाणार आहेत. वैद्यकीय सेवेसाठी उत्पादित केला जाणाऱ्या या ऑक्सिजनची शुद्धता ९६ टक्के असणार आहे. येत्या महिना अखेरीस हा प्लांट सुरु होणार असून याचा फायदा जिल्ह्यातील रुग्णालयांना आणि पर्यायाने रुग्णांना होणार आहे.