ऑक्सफॅम इंडिया आणि क्रांतिसूर्य प्रतिष्ठानने शासकीय रुग्णालयास केलेली मदत रुग्णांसाठी दिलासादायक : समीर यादव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.२५: ‘‘शासकीय रुग्णालयात प्रामुख्याने गोरगरीब जनताच वैद्यकीय उपचार घेत असल्याने येथे वैद्यकीय तपासणी व उपचाराची साधने दर्जेदार, अत्याधुनिक स्वरुपाची असली पाहिजेत यासाठी ऑक्सफॅम इंडिया आणि क्रांतिसूर्य प्रतिष्ठान यांनी केलेले प्रयत्न, घेतलेली मेहनत आणि त्यातून फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयास उपलब्ध झालेली सुमारे 13 लाख रुपये किंमतीची वैद्यकीय साधने निश्‍चित रुग्णांना दिलासा देणारी ठरतील’’, असा विश्‍वास तहसीलदार समीर यादव यांनी व्यक्त केला आहे.

ऑक्सफॅम इंडिया आणि क्रांतिसूर्य प्रतिष्ठान, फलटण यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध अत्याधुनिक वैद्यकीय साधने, सुविधांची माहिती घेऊन कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर कोणती वैद्यकीय साधने आवश्यक आहेत याबाबत रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करुन आतापर्यंत 2/3 वेळा काही साधने उपलब्ध करुन दिली आहेत. त्याच पद्धतीने तिसर्‍या टप्प्यात सुमारे 13 लाख रुपये किंमतीची साधने उपलब्ध करुन देण्यात आली. त्याप्रसंगी तहसीलदार समीर यादव बोलत होते. यावेळी ऑक्सफॅम इंडियाचे राज्य समन्वयक परमेश्‍वर पाटील, किरण कदम, संतोष धुमाळ, क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, प्रतिष्ठानच्या सचिव तथा फलटणच्या नगराध्यक्षा सौ. निताताई नेवसे, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ.व्यंकट धवन, वैद्यकीय अधिकारी डॉ.अंशुमन धुमाळ विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

फलटण शहर व तालुक्यात कोरोना कालावधीत सुमारे 30 हजार रुग्ण असुन, त्यापैकी सुमारे 4 हजार रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. त्यांना वैद्यकीय सेवा, सुविधा उपलब्ध करुन देताना आवश्यक साधने, सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था पुढे आल्याचे नमूद करीत क्रांतिसूर्य प्रतिष्ठान, ऑक्सफॅम इंडियाचा मोठा सहभाग नोंदविल्याचे नमूद करीत तहसीलदार समीर यादव यांनी मिलिंद नेवसे, सौ. निताताई नेवसे व त्यांच्या सहकार्‍यांना धन्यवाद दिले.

कोरोना कालावधीत शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपाययोजना करताना क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून नागरिकांना औषधे, जीवनावश्यक किट व अन्य मदत करताना आम्हाला ऑक्सफॅम इंडिया संस्थेने मोलाची मदत केली आहे. आगामी काळातही त्यांनी फलटणकरांना मदत व सहकार्य करावे, अशी अपेक्षा सौ. निताताई नेवसे यांनी व्यक्त केली.

प्रारंभी मिलिंद नेवसे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. डॉ. व्यंकट धवन यांनी ऑक्सफॅम इंडिया व क्रांतिसूर्य प्रतिष्ठानला धन्यवाद दिले.

प्रतिष्ठानचे संचालक सुनील नेवसे यांनी आभार प्रदर्शन केले.


Back to top button
Don`t copy text!