‘आपली फलटण मॅरेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, २२०० धावपटू रविवारी धावणार; मीरा बोरवणकर यांची प्रमुख उपस्थिती


स्थैर्य, फलटण, दि. ८ ऑक्टोबर : जोशी हॉस्पिटल आणि रोबोटिक्स सेंटर, फलटण यांच्या वतीने आयोजित ‘आपली फलटण मॅरेथॉन’ला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, फलटणसह पुणे, मुंबई आणि शेजारच्या जिल्ह्यांमधून सुमारे २२०० स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. ही मॅरेथॉन रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी होणार असून, यामध्ये ६५ वर्षांवरील सुमारे ५०० ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग हे यंदाचे वैशिष्ट्य आहे.

गेली ८ वर्षे आयोजित होणाऱ्या या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश लोकांना व्यायामाची सवय लावून आरोग्य उत्तम राखण्यास प्रोत्साहन देणे हा आहे, असे आयोजक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. प्राची जोशी यांनी सांगितले.

अवयवदान आणि वृक्षारोपणाचा संदेश

यावर्षी मॅरेथॉनच्या माध्यमातून अवयवदान जनजागृती आणि वृक्षारोपण व संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत, यशस्वी धावपटूंपैकी १ हजार जणांना देशी वृक्षांची रोपे दिली जाणार आहेत. जे स्पर्धक या रोपांचे ३ वर्षे संवर्धन करतील, त्यांना पुढील मॅरेथॉनमध्ये विनाशुल्क प्रवेश दिला जाईल, असे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.

प्रमुख उपस्थिती आणि बक्षिसे

यावर्षीच्या मॅरेथॉनचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या हस्ते होणार आहे. मॅरेथॉनची सुरुवात रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता सजाई गार्डन, विमानतळ येथून होईल. स्पर्धेतील ३ विभागांतील पुरुष व महिला गटांतील प्रत्येकी पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

किट वाटपाचे आवाहन

स्पर्धेत नावनोंदणी केलेल्या सर्वांनी आपले मॅरेथॉन किट (टाईम चीप बिब, टी-शर्ट, टोपी इत्यादी) दि. ९, १० व ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत जोशी हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून घेऊन जावे. स्पर्धेच्या दिवशी किट दिले जाणार नाही, याची नोंद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावर्षी विविध वयोगटांसाठी ३ किमी, ५ किमी, १० किमी आणि १५ किमी अंतराच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत, तसेच गुडघा शस्त्रक्रिया झालेल्या ९०० जणांसाठी १ किमीची विशेष ‘वॉकेथॉन’ देखील होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!