स्थैर्य, वाई दि.26 : नाताळाच्या सलग सुट्ट्यांमुळे पुणे – मुंबईकर पर्यटन व गावाकडे निघाल्याने पुणे बेंगलोर महामार्गावर सकाळ पासून मोठ्या प्रमाणात वाहनांची तुडूंब गर्दी झाली होती. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळाली. खेडशिवापुर व आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सलग तीन दिवसांच्या सुट्यामुळे अनेक नागरिक पर्यटनासाठी व गावाकडे जाण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने चांगलीच वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत.
करोना प्रादुर्भाव व टाळेबंदीमुळे नागरिक घरातच अडकून होते.सलग सुट्ट्या,मोठ्या शहरातील रात्रीची संचारबंदीमुळे नागरिकांनी पर्यटन व गावासाठी बाहेर पडण्याला प्राधान्य दिले आहे.
मागील अनेक दिवस कुटूंबासह घराबाहेर न पडलेले नागरिक करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुणेकर, मुंबईकर सुट्ट्यांमुळे कुटुंबासोबत शहराबाहेर पडू लागले आहेत.
पुणे-बेंगलोर महामार्गावर एकदम मोटारी रस्त्यावर उतरल्याने वाहतूक कोंडीत झाली आहे. महामार्गावर मुंबई-पुण्याचे पर्यटक कोल्हापूर, सातारा,सांगलीचे गावकडे जाणारे व पर्यटनासाठी महाबळेश्वर, कोकण गोव्याला जाणार्यांमुळे पुणे-बंगळूरू महामार्गावरील खेडशिवापूर आनेवाडी टोलनाका,खंबाटकी घाट,पसरणी घाटात वाहनांच्या रांगेत अडकल्याने मोटारीत नागरीक बसून कंटाळले.पुण्या मुंबईकडून येणार्या वाहनांची संख्या जास्त आहे.आज एस टी बस मध्ये गर्दी आहे.