स्थैर्य, कराड, दि. 9 : निरीक्षक वैधमापन शास्त्र, कराड विभागाच्यावतीने तपासणी पथकाने 2020 मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तपासणीत दोषी आढळलेल्या वेगवेगळ्या 11 आस्थापनांवर खटले दाखल करून 2 लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल करून शासनाकडे जमा केला.
यामध्ये छापील किमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे, पॅकबंद वस्तूंवर नियमानुसार माहिती नसणे, त्या वस्तूंची विक्री करणे, वजन मापात फसवणूक करणे आदी कारणास्तव तपासणी करून खटले नोंदविण्यात आले आहेत. या वस्तूंमध्ये फेस मास्क, सॅनिटायझर, थंड पेय, किराणा माल, बेकरी पदार्थ, बांधकाम साहित्य यावर कारवाई करून संबंधितांकडून माल जप्त करून खटले दाखल करण्यात आले आहेत. सदरचे खटले मेडिकल स्टोअर विक्रेते, बेकरी पदार्थ विक्रेते, किराणा व्यावसायिक, बांधकाम साहित्य विक्रेते वितरक यांच्यावर नोंदविण्यात आले आहेत.
अशा 11 खटल्यांमधून कराडच्या वैधमापन शास्त्र तपासणी पथकाने 2 लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या तपासणी मोहिमेत वैधमापन शास्त्र, कराड विभागाचे निरीक्षक एल. यु. कुटे, क्षेत्र सहाय्यक सी. आर. जाधव, ए. वाय. कदम यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे एल. यु. कुटे यांनी सांगितले.