कोरोनानंतरच्या जगाची रुपरेखा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


कोरोना विषाणूचा बंदोबस्त केल्यानंतरचे जग कसे असेल, त्याचा उहापोह मागल्या चार महिन्यांपासून चालू आहे. अगदी अर्थशास्त्रापासून राजकीय प्रशासकीय गोष्टी कशा असतील, त्याची चर्चा चालली आहे. पण सर्वात पहिले उत्तर कोरोनाला रोखण्यासाठी मिळाले पाहिजे, याचेही भान अशा चर्चा करणार्‍यांपाशी नाही, हे स्पष्ट झालेले आहे. किंबहूना अशा चर्चा रंगवणार्‍यांना कोरोनाच्या संकटाची व्याप्ती तरी कळली आहे किंवा नाही, अशी शंका येते. कोरोना हे पहिले असे सांसर्गिक संकट नाही किंवा पहिलाच जागतिक साथीचा आजार नाही. तशा अनेक साथी आजवर आलेल्या आहेत आणि त्यांनी मानव जातीसमोर अस्तित्वाचा यक्षप्रश्न उभा केलेला आहे. त्यावेळीही मानवाची अशी तारांबळ उडालेली होती. अगदी गंडेदोरे बांधण्यापासून वैद्यकीय उपचारापर्यंत अनेक मार्गांचा अवलंब करून जगात प्रत्येक देशातल्या जनतेने त्यांचा सामना केलेला आहे. मात्र त्या प्रत्येक प्रसंगी जुन्या गोष्टींचा त्याग करून नव्याने उभे रहाण्याखेरीज माणसापुढे अन्य कुठलाही पर्याय नव्हता. नवे पर्याय व नवे उपाय माणसाला इथपर्यंत घेऊन आलेले आहेत. यापुर्वी काय केले त्याकडे पाठ फ़िरवून नव्याची कास धरावी लागलेली आहे. मग कोरोनावर मात करताना किंवा त्यानंतरच्या नव्या जगाची उभारणी करताना तरी जुने निकष कशाला उपयोगी ठरू शकतील? पण त्याचा मागमूस नव्या जगाचा विचार करणार्‍यांमध्ये आढळून येत नाही, ही खरीखुरी शोकांतिका आहे. म्हणून मग असे वाटते, की या जाणकार म्हणवणार्‍यांना अजून कोरोनाची व्याप्तीच उमजलेली नाही. सहाजिकच भविष्यातले वा कोरोनानंतरचे जग कसे असेल, त्याची कल्पनाही त्यांच्या मनात येऊ शकणार नाही. ती कल्पना करण्याची हिंमत वा इच्छाही अशा लोकांपाशी असू शकत नाही. काय आहे कोरोना?

कोरोना हा अगदी नवा विषाणू आहे? कमीअधिक प्रमाणात त्याची लक्षणे वा त्रास जुन्या कुठल्या तरी आजाराशी जुळणारा असला, तरी त्याची पसरण्याची कुवत अपार आहे. त्याने एका फ़टक्यात किंवा अवघ्या काही महिन्यात माणसाने मागल्या शतकात मेहनतीने उभे केलेले अवघे जग विस्कटून टाकलेले आहे. महाशक्ती वा प्रगत देश असल्या कल्पनाही धुळीला मिळवलेल्या आहेत. भारतासारखा तुलनेने गरीब देश त्याच्याशी समर्थपणे सामना करीत असताना प्रगत युरोप व अमेरिकेने त्याच्यापुढे गुडघे टेकलेले आहेत. विविध अत्याधुनिक साधने व उपकरणेही तोकडी पडली असताना विपन्नावस्थेतला भारतातला कोट्यवधी नागरिक तुलनेने सुखरूप राहिलेला आहे. अतिशय विचारपुर्वक केलेली गुंतवणूक वा उभारलेले उद्योग व्यापार या रोगाने जमिनदोस्त करून टाकलेले आहेत. युरोपात तर जवळपास जुनी पिढीच कोरोनाने मारून टाकलेली आहे. त्यांनी शोधून काढलेली औषधे व उपचाराच्या सुविधा निकामी ठरवल्या आहेत. हजारो वर्षापुर्वीचा मानव जसा अगतिक व हताश निराश होता, तशी अवस्था या आजाराने करून टाकली आहे. मग त्याच्यावर मात करण्यासाठी नव्या पद्धती व नवे उपाय शोधण्याला पर्यायच उरलेला नाही. जी स्थिती त्या आजाराची बाधा झालेल्या माणसाला वाचवण्याच्या बाबतीत आहे, त्यापेक्षा त्यामुळे उध्वस्त झालेल्या विविध व्यवस्था नव्याने उभारण्याची समस्याही किंचीत वेगळी नाही. ती कालची अर्थव्यवस्था, उत्पादन पद्धती वा वितरण वा व्यापार शैली यांच्यासह जीवनशैली यांना आता नव्या जगात स्थान नसेल. कित्येक वर्षात व पिढ्यातून तयार झालेल्या आपल्या सवयी कोरोनाने घातक ठरवल्या आहेत. त्यांना बदलताना जगण्याच्या अन्य क्षेत्रातील निकष व नियमही आमुलाग्र बदलावे लागणार आहेत. दोन माणसांमधले अंतर कायम जपायचे, म्हणजे जगण्यातला व्यवहारच बदलून जातो ना?

दाटीवाटीच्या वस्त्या व कामाच्या जागांपुरता हा बदल पुरेसा नाही. मानवी स्पर्श, संपर्कच रोगाला आमंत्रण असेल तर समाजजीवन कसे चालणार आहे? ते जुन्या पद्धतीने चालणार नसेल तर एकूण व्यापार, व्यवहार व उद्योगही बदलण्याला पर्याय उरत नाही. आजवर माणूस जसा जगत आला, त्याच आधारावर बाकीच्या व्यवस्था उभारलेल्या आहेत. सहाजिकच त्या जगण्याच्या शैली व सवयीलाच फ़ाटा द्यायचा असेल, तर त्यावर बेतलेल्या विविध व्यवस्था व रचनाही निरूपयोगी होऊन जातात. माणसाच्या आयुष्यातील जीवनावश्यक वस्तु वा सेवांमुळे व्यापार चालतो. सवयी बदलल्या तर त्या जीवनावश्यक वस्तु व सेवांचे स्वरूपही बदलून जाणार ना? मग तेच बदलणार असेल तर आपोआप त्याचा बाजार बदलतो आणि उत्पादनाच्या प्रणाली बदलाव्या लागतात. अशा अनेक पद्धती, प्रणालींवर समाजाचे व जगाचे अर्थशास्त्र बेतलेले आहे. त्याच्या विकासातून वा उलगडण्यातून त्याचे नियम निर्माण झालेले आहेत. ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही. मग ज्या पायावर आधारीत ही शास्त्रे व त्यांचे नियम निकष उभारले गेले आहेत, तो पायाच पुरता बदलून जाणार आहे. मग जुन्या निकष नियमानुसारचे अर्थकारण चालणार कसे? आज जाणकार म्हणवणारे म्हणूनच जुन्या पायावर नव्या जगाच्या कल्पना मांडतात, ते चमत्कारीक वाटते. त्यांचे दावे मनोरंजक तितकेच हास्यास्पद वाटतात. त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे चिनी एप्सवर भारताने अचानक घातलेली बंदी होय. ती घोषणा केल्यावर किंवा चिनी मालावरच्या बहिष्काराची भाषा झाल्यावर यापैकी बहुतांश अर्थ जाणकारांनी टवाळी केली होती. चीनला काहीही फ़रक पडणार नाही अशी ग्वाही दिलेली होती. व्यवहारात त्याचे काय परिणाम दिसले? बघता बघता चीनला घाम फ़ुटला आहे. ते प्रतिबंध चीनला भयभीत करून गेले आहेत. इथे अर्थशास्त्री कशाला चुकले? त्यांना कोरोनानंतरच्या परिस्थितीचे आकलन झालेले नाही.

कोरोनापुर्वीचे जग आणि आजच्या जगातला मोठा फ़रक कोंणता? अर्धे जग चीनमध्ये उत्पादित मालावर विसंबून होते आणि चीनही त्या अर्ध्या जगाला माल पुरवण्यासाठी उत्पादन करण्यावरच आपली अर्थव्यवस्था उभारून बसला होता. पण त्याच ग्राहकाची माया आटली आणि चिनमधल्या उत्पादक व्यवस्थेला कामच उरले नाही. आज चिनच्या अनेक प्रांतामध्ये सामान्य नागरिक वा व्यावसायिकाला मोठी रक्कम खात्यात असूनही बॅन्केतून काढता येत नाही. कारण उत्पादन व निर्यात घटल्याने चिनच्या अनेक बॅन्कांमध्ये आपल्याच खातेदारांना द्यायला रोखीची चणचण भासू लागली आहे.जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून आपल्याच देशातले अर्थशास्त्री चीनचे गुणगान करीत होते. बहिष्काराने फ़रक पडणार नव्हता, तर चिनला रोकड कशाला कमी पडू लागली आहे? त्याचे उत्तर कोरोना आहे. जितका माल चीन उत्पादित करतो, त्यातला बहुतांश जगाला विकण्यावर चिनी जनतेची गुजराण होत असते. उत्पादित मालाला ग्राहक उरला नाही, कारण कोरोनाने त्याला दिवाळखोर केलेले आहे. त्याचा हिशोब वा परिणाम नव्या निकषांवर मोजावा लागणार आहे. त्याचाच पत्ता नसेल वा ते निकषच तयार नसतील, तर भविष्याचे आडाखे बांधता येणार नाहीत. बांधले तरी त्यात मोठी गफ़लत होऊन जाते. म्हणूनच चिनी एप्सवर बंदी घालण्याची हेटाळणी करणारे तोंडघशी पडलेले आहेत. अशाच लोकांनी कोरोनानंतरच्या जगाची कल्पना मांडणे म्हणूनच हास्यास्पद आहे. कोरोनाने जागतिक आरोग्य संघटनाच जमिनदोस्त करून टाकली आहे आणि त्याच रोगाने राष्ट्रसंघाला निरूपयोगीही ठरवून टाकलेले आहे. मग उरलेल्या संस्था वा विविध देशातल्या संस्था व्यवस्था यांची काय हुकूमत शिल्लक असेल? दुसर्‍या महायुद्धापुर्वी जी अराजकाची स्थिती होती, तसाच काहीसा प्रकार घडतो आहे आणि त्याच्या नियंत्रणाचे सगळे नियम व निकष नव्याने बनवावे लागणार आहेत. हे कसे ठरणार? कोण ठरवणार आहे?

दुसर्‍या महायुद्धाने जगाचा चेहरामोहरा पुर्णपणे बदलून टाकला असे आपण म्हणतो. पण बदलला म्हणजे नेमके काय घडले होते? जे व्यापाराच्या निमीत्ताने युरोपातले पुढारलेले समाज जगाच्या अन्य भागात पोहोचले होते, त्यांनी तिथे आपल्या वसाहती निर्माण केल्या होत्या. त्यांनी आधुनिक यंत्रतंत्र यांच्या सहीत शस्त्रबळाने इतरांना गुलाम करून ठेवले होते. स्थीर शासन प्रणाली बहाल करून सरंजामशाही व राजेशाही निकालात काढली होती. ती वसाहतीची साम्राज्ये दुसर्‍या महायुद्धाने खालसा करून टाकली. वसाहतींवर राज्य करताना युरोपियनांनी जी शासनपद्धती व उत्पादन व्यवस्था उभारली, त्यातून स्थानिकांमध्ये स्वतंत्र होण्याची इर्षा निर्माण केली. त्यांना नंतर शस्त्राने धाकात ठेवणे अशक्य झाल्याने ती साम्राज्ये लयास गेली. एक एक वसाहतीला स्वातंत्र्य देण्यातून त्या साम्राज्यांचा शेवट होत असतानाच अमेरिका व कम्युनिस्ट साम्राज्ये उदयास आली आणि वैचारिक वा आर्थिक बळावरची साम्राज्ये उभी राहिली. त्यातून जी वेगळी नवी जागतिक व्यवस्था उदयास आलेली होती, ती अलिकडे कालबाह्य झालेली होती. पण कोसळून पडत नव्हती. तिला कुठून तरी मोठा धक्का दिला जाण्याची आवश्यकता होती व तेच काम कोरोनाने उरकले आहे. आर्थिक व व्यापारी वैचारिक बळावर जगाला मुठीत ठेवण्याचे युग आता संपले आहे वा कोरोनाने संपवले आहे. त्यामुळे त्या कालबाह्य व्यवस्थेतील अर्थकारण, राजकारण वा त्याला चालवणार्‍या रचना आता उपयोगाच्या राहिलेल्या नाहीत. कोरोनानेच त्याची साक्ष दिली आहे. अमेरिकेच्या श्रीमंती वा आधुनिक जीवनशैलीला त्याने उध्वस्त केले आहे. त्याच पठडीतून जगावर राज्य करायची महत्वाकांक्षा बाळगून मागल्या दोन दशकात वाटचाल केलेल्या चीनवर दिवाळखोर व्हायची पाळी आलेली आहे. ती व्यवस्था जपणे किंवा तिचीच डागडुजी करून चालू ठेवण्याचे प्रयास कामाचे नाहीत. हाच कोरोनाचा संदेश आहे.

आयातनिर्यात, व्यापार किंवा भांडवल यांच्या व्याख्याही नव्याने बनवाव्या लागणार आहेत. बाजारपेठ वा ग्राहकाची नवी व्याख्या होणार आहे, तसाच उत्पादक या शब्दाचा अर्थही बदलून जाणार आहे. या आर्थिक अराजकामध्ये स्वयंभूपणे उभा राहू शकेल आणि आपली लोकसंख्या व उत्पादक ग्राहक यांचे योग्य समिकरण मांडून जगासमोर उभा ठाकणार, त्यालाच पुढल्या काळात जगाचे नेतृत्व करायला मिळणार आहे. भविष्यातल्या अर्थकारणाला नवी दिशा भारतच देऊ शकेल असे जगातले अनेक अनुभवी लोक उगाच बोलत नाहीत. कारण नव्या जगातले खरेखुरे भांडवल डॉलर, रुपया वा चलनी नाणे नसेल. तर जीताजागता कष्ट उपसू शकणारा मानव समाज हे भांडवल आहे. ती लोकसंख्या भारतापाशी आहे आणि ती अपुर्‍या साधने व उपायांनिशी कोरोनाला समर्थपणे टक्कर देऊन उभी आहे. आज भारतात कोरोनाने कहर केला असे म्हटले जात असतानाही अमेरिकेपेक्षा दैनंदिन बाधितांचा येणारा आकडा कमी आहे आणि कोरोना मृत्यूचे जगातले सर्वात किमान प्रमाणही भारतातच आहे. याचा अर्थ अशा रोगट संकटाशी समर्थपणे दोन हात करण्याची जीवनशैली भारतापाशी आहे. रोगप्रतिबंधक शक्तीचा तो साक्षात्कारच आहे. एकीकडे चीनपाशी मोठी सज्ज उत्पादक व्यवस्था आहे, पण विश्वासार्हता गमावलेली आहे. दुसरीकडे जगाची निकड असलेल्या कोरोनाच्या लसीचे स्वस्त व कमाल उत्पादन वेगाने करू शकणारी क्षमता भारतापासी उपलब्ध आहे. त्यातून मिळणारी विश्वासार्हता व्यापारी पद्धतीने कुशलतेने वापरली तर जगाला जीवनावश्यक वस्तूंचा सतत पुरवठा करू शकणारी उत्पादन व्यवस्था अल्पावधीत उभी करण्याची पात्रताही भारतापाशी आहे. यांची एकत्रित गोळाबेरीज केली, तर कोरोनानंतरच्या जागतिक रचनेची कल्पना करता येईल. जिओ नामक कंपनीमध्ये मंदीच्या मोसमात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक कशाला आली, त्याचे उत्तर शोधायला गेल्यास भविष्याची चाहूल लागू शकेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!