दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात फलटण, सातारा, खटाव, कराड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा व जावली असे 9 तालुक्यातील 71 गावांमध्ये लंम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. आज अखेर गाय 501 व 71 बैल असे एकूण 572 जनावरांस लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच आज दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हयामध्ये 6 जनावरांचा मृत्यु झाला असून (आज अखेर 34 गायी + 9 बैल असे एकूण 43 पशुधन मृत झाले आहे ) आज अखेर 76 गाई व 6 बैल असे एकूण 82 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झालेली आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली आहे.
लंम्पी चर्म रोग उपचारासाठी सर्व आवश्यक औषधे, शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकीत्सालायांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील एकूण 422 गावातील 1 लाख 41 हजार 320 पशुधनास लसीकरण करण्यात येत आहे.
लंम्पी चर्म रोग औषधोपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्यात अथवा पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.18002330418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा.
सातारा जिल्ह्याकडे 2 लाख 81 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून यांमधून आज अखेर बाधित क्षेत्रातील गावांमध्ये 1 लाख 17 हजार 429 व इतर अबाधित क्षेत्रातील गावांमध्ये 25 हजार 634 असे एकूण 1 लाख 43 हजार 63 पशुधनाचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे.