दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२१ । सातारा । ओमिक्रोनचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर साताऱ्यात जगभरातून ६१४ नागरिक आले आहेत. यापैकी १९ नागरिकांचा शोधच प्रशासनाला लागत नसल्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. साताऱ्यात फलटण येथे ओमिक्रोनचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या गहाळ १९ नागरिकांबाबत प्रशासन सतर्क झाले असून त्यांची शोधमोहीम प्रशासन पोलिसांच्या मदतीने राबवणार आहे.
ओमिक्रोनचा प्रादुर्भाव जगभर वाढू लागल्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. साताऱ्यातही तीन रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या विषाणूंच्या संभाव्य धोका टाळण्यासाठी सातारा जिल्ह्यातही आवश्यक ती मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. मागील २१ दिवसात परदेशातून साताऱ्यात ६१४ नागरिक आले आहेत .यापैकी २७४ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. मात्र त्यातील १९ नागरिकांचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकाची विमानतळावर तपासणी होते. गावी आल्यावर आठ दिवसाने पुन्हा आरोग्य विभागाकडून तपासणी होते.
मागील आठवड्यात फलटण येथे युगांडा येथून आलेल्या तीन नागरिकांना ओमिक्रोनची लागण झाली. त्यामुळे त्यांना फलटण येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. साताऱ्यात २८ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत जगभरातून ६१४ नागरिक आले. या नागरिकांना गृहविलगीकरण ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये सातारा(१८८) वाई (४९)फलटण (३८) कराड (१२६) महाबळेश्वर (१२) जावली (८) कोरेगाव (२८) खटाव (३६) माण (१३) पाटण (१३) खंडाळा (२०) तालुक्यांमध्ये नागरिक आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक सातारा तालुक्यातील १८८ नागरिक आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांनी मोबाईल नंबर व चुकीचा पत्ता दिल्याने या १९ प्रवाशांचा ठावठिकाणा सापडत नाही. यामध्ये सातारा (१४) जावली (१) महाबळेश्वर (२) कराड (१) खटाव (१) आलेले नागरिक गहाळ आहेत. त्यांचा ठावठिकाणा लागत नाही.
ओमिक्रोनच्या प्रादुर्भावापासून खबरदारी घेण्यासाठी आरोग्य विभाग उपाययोजना राबवित आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची संपर्क केला जात आहे. मात्र काही नागरिकांशी संपर्क होण्यात अडथळा येत आहे. आरटीपीसीआर चाचणी केलेल्यानंतरही विलगीकरण ठेवल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दिली. परदेशातून आल्यानंतर विलगीकरणात राहावे लागू नये व भीतीपोटी अनेक जण चुकीचा पत्ता व मोबाईल क्रमांक देत आहेत. फलटण येथे युगांडा येथून आलेले चार नागरिक सुरुवातीला गायब झाले होते. त्यांचा शोध लागत नव्हता. त्यांचा शोध लागल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली त्यात ते सुरवातीला करोना बाधित आढळूण आले. यातील चार पैकी तीन जणांनाओमिक्रोनची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे व संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे असेही सचिन पाटील यांनी सांगितले.