स्थैर्य ,मुंबई, दि. ४: शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून महाकृषिऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
महाकृषिऊर्जा अभियानांतर्गत कृषिऊर्जा पर्वाचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते विधान भवनात करण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आदी उपस्थित होते.
सर्व देश, राज्य टाळेबंदीत (लॉकडाऊन) होते तरी शेतकरी बांधव मात्र कर्तव्यावर होते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कार्यालयीन कामे घरूनच (वर्क फ्रॉम होम) केली जात होती. शेतकऱ्यांनी लॉकडाऊन केले असते तर कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. इतरांसाठी मळे फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काटे येऊ नयेत यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे सरकार ठामपणे उभे राहील, अशी ग्वाहीदेखील ठाकरे यांनी दिली.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरणांतर्गत १९ फेब्रुवारीपर्यंत १० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे उद्दिष्टापेक्षाही अधिक काम करत सुमारे १८ हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. तसेच १० हजारांहून अधिक सौर कृषिपंप देण्यात आले आहेत. कृषी वाहिन्यांच्या सौरऊर्जाकरणांतर्गत ८४ वाहिन्यांना लघु सौरऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवली जात असून त्याद्वारे ३० हजारांहून अधिक शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.
कृषिऊर्जा पर्वांतर्गत १४ एप्रिलपर्यंत विविध उपक्रम
कृषिऊर्जा पर्वांतर्गत १ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाकृषीऊर्जा अभियानाची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्यात येणार आहे. कोरोना निर्बंधाचे पालन करत कृषी वीज ग्राहकांचा मेळावा, ग्राहक संपर्क अभियान, ग्रामपंचायत, ग्रामसभेत प्रबोधन करणे असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
वीज बिलांची थकबाकी भरून योजनेचा लाभ घ्या : पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, वीज ग्राहकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. वीज बिल थकलेल्या सर्व शेतकऱ्यांनी थकीत वीज बिलांवर सूट मिळवण्यासाठी नवीन कृषी वीज जोडणी धोरणांतर्गत जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी केले. तसेच शेतकरी, घरगुती वीज ग्राहक आदी सर्वांनाच व्यवस्थित वीज मिळाली पाहिजे यासाठी सर्वांनी वीज बिले भरणे आवश्यक आहे. वीज गळती होणार नाही याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असेही पवार म्हणाले.