
स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑगस्ट : गणेशोत्सवाचे बाजारीकरण थांबावे आणि प्रत्येक सामान्य भक्ताला आपल्या घरी गणेश मूर्तीची स्थापना करता यावी, या उदात्त हेतूने ‘मूर्ती आमची, किंमत तुमची’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात भाविक आपल्या श्रद्धेनुसार मूर्तीची किंमत दानपेटीत टाकू शकणार आहेत, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अनुप शहा व माजी नगरसेवक फिरोज आतार यांनी दिली.
हा उपक्रम फलटण येथे अनुप शहा यांच्या संपर्क कार्यालयात सुरू करण्यात आला आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत भाविकांसाठी पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती उपलब्ध असतील. सार्वजनिक गणेश मंडळे तसेच शहरातील विविध भागांतील नागरिक या उपक्रमाचा लाभ घेऊ शकतात. हा उपक्रम मूर्तींचा साठा असेपर्यंतच सुरू राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम धार्मिक कार्यासाठी तसेच गरजू, दिव्यांग आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती देण्यासाठी वापरली जाणार आहे. यामुळे गणेशोत्सवाला सामाजिक कार्याची जोड देऊन पुण्य मिळवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे, असे आयोजकांनी म्हटले आहे.
अनुप शहा फ्रेंड्स सर्कल, नगरसेवक फिरोज आतार मित्र मंडळ आणि माऊली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे. भाविकांनी या उपक्रमाला मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अनुप शहा आणि फिरोज आतार यांनी केले आहे.