स्थैर्य, नागपूर, दि. ११: नागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुढील काही दिवसात आणखी वाढण्याची वैद्यकीय सुत्रांची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या व जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीच्या परिस्थितीत सर्वोच्च आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे. त्यासाठी प्रशासन, पोलीस, आरोग्य, महापालिका या सर्व यंत्रणांनी नियोजनपूर्वक एकछत्री अंमलात जबाबदारीने काम करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिले.
मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आज दोन सविस्तर बैठकी घेतल्या. पहिली बैठक महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाली. या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. व पोलीस आयुक्त अमितेशकुमार व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने गर्दीवर नियंत्रण करून संसर्ग पसरण्यापासून रोखण्याचे आवाहन करण्यात आले.
कोरोनावर मात करण्यासाठी एस.एम.एस.(सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनीटायझर) हे प्रभावी उपाय आहेत. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर किमान १४ दिवस लॉकडाऊन लावावा लागेल. मात्र लॉकडाऊन केल्यास गोर-गरीब, निराधार, छोटे दुकानदार, फुटपाथ विक्रेते, बेरोजगार इत्यादी घटकांचे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. उद्योगांवर देखील विपरित परिणाम होईल. मात्र परिस्थिती अशीच गंभीर राहिल्यास काही दिवस लॉकडाऊन करण्याबाबतचा विचार करता येईल का? या संदर्भातही त्यांनी यावेळी चर्चा केली.
गर्दीवरील नियंत्रणाबाबत पालकमंत्र्यांनी सर्वाधिक चिंता व्यक्त केली. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर निघू नये. शक्यतो ऑनलाईन पद्धतीने खरेदीचे धोरण स्वीकारायला हवे. बाहेरून आपल्या घरात येणारा व्यक्ती कोरोना घेऊन येऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहण्यासाठी नागरिकांची मानसिकता तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासाठी सर्वस्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रचार, प्रसार यंत्रणा राबविण्याबाबत त्यांनी निर्देशित केले. माध्यमांनी देखील या जनजागृतीमध्ये सहभागी होणे. गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस स्टेशन निहाय “कोरोना सुरक्षा समिती” स्थापन करणे, लोकसहभागातून जनतेला आवाहन करणे, गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस विभागाने एस.ओ.पी. तयार करून त्याची ताबडतोब अंमलबजावणी करावी, गस्त, बंदोबस्त, वाहनातून आवाहन, वाहतूक व्यवस्थेत बदल करून गर्दी नियंत्रणात आणून कोरोनाचा वाढता प्रसार थांबवावा. पोलीस विभागाने जनजागृती करून गर्दीवर नियंत्रण आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.