आमचा पहिला हिमालयन ट्रेक अविस्मरणीय ,अद्वितीय आणि सुरेख ! : डॉ. प्रसाद जोशी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१९ नोव्हेंबर २०२१ । फलटण । गेल्या सहा महिन्या पासून तयारी सुरू होती. कटारीयन्स ची ८७ ची बॅच CMA Amit Apte आमचा म्होरक्या जो की हिमालय मध्ये १० ट्रेकस करून आधीच आल्यामुळे त्याच्या भरवशावर आम्ही हिमालयात ट्रेक ला जायचे ठरवले.

पुण्यातील GGIM आणि काठमांडू मधील PEAK PROMOTION या संस्थेशी बोलणी करून नियोजन केले.
तयारी सुरू झाली. बूट, थर्मल्स, जॅकेट्स, ग्लोवस, वॉकींग स्टिकस अशी ट्रेक ला लागणारी सामग्री कोठून आणायची याबद्दल माहिती घेऊन ती गोळा करण्यास सुरुवात केली. Decatholon ह्या दुकानामध्ये बऱ्याच गोष्टी मिळाल्या. ट्रेकचा काहीच अनुभव नसल्यामुळे तो किती कठीण असतो आणि कसा होईल या बद्दल एक उत्सुकता आणि उत्साह असे दोन्ही होते.

हो नाही करता करता १५ लोक तयार झाले आणि मग नोव्हेंबर मध्ये जायचे ठरले. फलटण मधून माझे सहकारी डॉ Sharad Dhaigude आणि डॉ Dhananjay Kutwal यांनी पण यायचे निश्चित केले.

लागणारी सर्व सामग्री गोळा झाली. तयारी म्हणून हिमालयन ट्रेक केलेल्या लोकांच्या अनुभवातून स्वतःचा फिटनेस उत्तम असणे ही पहिली महत्वाची बाब होती. सर्व पीक्सची हाईट (altitude) उंच असल्यामुळे oxygen लेव्हल ही मुळातच ६० ते ७० टक्के किंवा काही ठिकाणी ५० टक्के सुद्धा असते असे सांगण्यात आले. त्याबद्दल चे मोलाचे मार्गदर्शन आमच्यातीलच निलेश हर्डीकर यांचे सासरे श्रीयुत चंद्रशेखर बापट काका यांनी आम्हाला केले.ते स्वतः २५एक वर्ष ट्रेकिंग करत आहेत आणि आता त्यांचे ७२ वय आहे. त्यांनी आम्हाला फार मोठे प्रोत्साहन दिले.त्यांच्या सांगण्याप्रमाणे आमची प्रतिकार शक्ती आणि फुफुसांची क्षमता उत्तम ठेवणे ही मूलभूत गरज होती. रोजचा १ तास व्यायाम मग त्यात प्रामुख्याने प्राणायाम, चालणे, पळणे, दोरीच्या उड्या आणि जिने चढ-उतार करणे हे फार महत्वाचे ठरणार होते.

दर रविवारी महाराष्ट्रातील गड-किल्ले सर करण्याचे ठरवले मग त्यामध्ये #jarandeshwar, #varugad, Raigad, India, #rajgadfort आणि मग #sinhgad असे चालून पालथे घातले.

शेवटी जाण्याचा दिवस उजाडला आणि पुण्याहून सर्व जण निघाले. दिल्ली, काठमांडू आणि मग लुकला असा विमानाचा प्रवास झाला आणि लुकला पासून प्रत्यक्ष ट्रेक सुरू झाला.
पहिल्या दिवशी लुकला ते फाकडिंग असा ११ km चा पल्ला पहिल्या दिवशी ३डिग्री तापमानात चालत चालत पूर्ण केला.

समुद्र सपाटी पासून त्याची उंची ८५००फूट होती.
दुसऱ्या दिवशी फाकडिंग ते नामचे असा १२ km चा प्रवास कडकडीत थंडी मध्ये करण्यात आला. समुद्र सपाटी पासून त्याची उंची ११२८३ फूट होती.

तिसऱ्या दिवशी उंची आणि कमी प्राणवायूची सवय व्हावी म्हणून नामचे ते माऊंट-एवरेस्ट हॉटेल की जे १२५०० फुटावर आहे तिथे गेलो. तिथून सगळे peaks जसे की सगरमाथा (माऊंटएवरेस्ट) ,नूप्तसे (Nuptse), लोटसे (lothse), पीक 38, टोबुचे(tobuche) असे बरेच हिमालयातील डोंगर पाहण्याचा सुखद अनुभव आला.

चौथ्या दिवशी नामचे (Namache) ते डोले (Dole)असा १४ km चा पल्ला पायदळी पार केला . तापमान 0 ^ celcius होते आणि प्रचंड थंडी जाणवत होती. समुद्र सपाटी पासून उंची १२५०० फूट होती. एवढ्या थंडीची सवय नसल्यामुळे रात्र वैऱ्याची होती पण गत्यंतर नसल्यामुळे मनाला धीर देत देत रात्र काढली.

पाचव्या दिवशी डोले ते माचेर्मो (Machermo) असा ८ km चा पल्ला पार केला. उंची १४७६२ फूट होती. तापमान ३ ते ५ डिग्री होते.

सहाव्या दिवशी माचेर्मो मधून सकाळी निघून गोकियो valley की जी १५५०० फूट उंच आहे तिथे ८ km पायी चालत गेलो. हिमालय म्हणजे धरतीवरचा स्वर्ग आहे असे म्हणतात आणि तशी प्रचिती खरच आली . तीन अतिशय सुंदर तळी तिथे पाहायला मिळाली . आजूबाजूला पर्वतांच्या उंचच उंच रांगा आणि काही पर्वतांवर पसरलेला बर्फ आणि मध्ये तळ्यात असलेले निळे-झार पाणी असे अविस्मरणीय सौंदर्य डोळ्यात आणि मनात मावत नव्हते . गोकियो valley ला प्रत्यक्षात पाहिलेला स्वर्ग म्हणले तर वावगे ठरणार नाही. तापमान
-३ डिग्री celcius होते.

सातव्या दिवशी गोकियो valley पासून गोकियो री(Gokiyo Ri) हा डोंगर सर करायचा होता. उंची १७५८६ फूट गाठायची होती .शारिरीक आणि मानसिक कासौटिच होती जणू . २ तास आणि १५ मिनिटात तो डोंगर सर केला .वर गेल्यावर जे दृश्य दिसले ते डोळ्यात परत मावेना.तापमान
उणे(-)१० डिग्री celcius होते.प्रचंड वारा सुटला होता .
सर्व peaks मध्ये माऊंट एवरेस्ट दिमाखात उभा होता . गोकियो valley मधील तीन लेक्स , इंजिओझुंपा ग्लेशियर फारच मनमोहक दिसत होता .

कटारीयन्स च्या ८७ ची बॅच आणि आम्ही फलटण चे तीन डॉक्टर्स या सर्व शिवरायांच्या मावळ्यांनी गोकियो री चे समिट सर केले होते .सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता. वयाची ५० शी अशी साजरी करण्याचा मानस पूर्ण झाला होता. समिट वर पोहोचल्यानंतर आनंदाला पारावर राहिला नाही आणि सर्वांनी एकमेकाला मिठ्या मारत अतिशय भावुक होऊन आनंदाश्रुंना वाट मोकळी करून दिली . आपण या निसर्गापुढे किती छोटे आहोत हे प्रकर्षानी जाणवले.खाली आल्यानंतर आपण हा डोंगर कसा चढलो ह्याचे आश्चर्यच वाटले.

परतीचा प्रवास सोपा होता कारण उतार होता आणि काम फत्ते झाल्यामुळे मनावरचे ओझे हलके झाले होते.

ज्या मार्गे आलो तसेच परत जायचे होते. शेवटच्या दिवशी मग न चालता हेलिकॉप्टर राईड घ्यायचे सर्वांनी ठरवले आणि मग केंगजुमाँ पासून पेरीचे आणि मग कालापत्थर वर उतरून सागरमाथा (Mount Everest) चे जवळून मनमुराद दर्शन घेतले आणि मग डायरेक्ट लुकला ला आलो. ती राईड म्हणजे एक स्वर्गीय अनुभूतीच होती .

लुकला हुन काठमांडू आणि मग दिल्ली वरून पुणे असा हा सगळा प्रवास झाला. साधारण त्या १०दिवसात १०० कि मी चालणे झाले पण पाय अजिबात दुखले नाहीत !कदाचित सर्वांनी काम फत्ते करायचा निर्णयच केला होता जणू!

ह्या ट्रेक मुळे आम्ही काय शिकलो !
१.शारिरीक स्वास्थ्य फार मोलाचे आहे . सिर सलामत तो पगडी पचास ही म्हण तेव्हा प्रकर्षाने आठवली .
२. हाय altitude चा त्रास कोणाला कधी होईल आणि कोणाला कधी होणार नाही हे कधीच कोणी सांगू शकत नाही .त्यामुळे ते होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेणे इष्टच.
३.सर्दी आणि lung इन्फेकॅशन टाळण्यासाठी सतत गरम पाणी २ ते ३ लिटर दिवसातून पिणे गरजेचे आहे .अंघोळ करू नका असे आम्हाला सांगण्यात आले होते आणि आम्ही ते आवर्जून पाळले.
४.रोज प्राणायाम केल्यास तुम्हाला त्रास नक्कीच कमी होतो हे नक्की.
५. मानसिक सकारात्मकता आणि दुर्दम्य इच्छाशक्ती याच्या जोरावर आपण काहीही करू शकतो ह्याची प्रचिती नक्कीच आली.
६.हिमालयातील ट्रेक करणे म्हणजे पूर्वतयारी फार महत्वाची आहे , प्रासंगिक (Casual) राहणे म्हणजे संकटांना निमंत्रण देणे हेच खरे.
७. आमचा सर्वांना एक मोलाचा सल्ला राहील की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी हिमालयामध्ये ट्रेक करावा आणि स्वर्गीय सुखाचा अनुभव जरूर घ्यावा असे आम्ही जरूर सांगू इच्छितो.
तर जात जाता ,
हिमालयातील पर्वतांच्या रांगा तुम्हाला देईल स्वर्गीय आणि अद्भुत आनंद!
एकदातरी नक्कीच जाऊन अनुभूती घ्याल तर होईल तुमचे जीवन मद-भाग्यवंत!!

डॉ प्रसाद जोशी
अस्थीरोग शल्य-चिकित्सक
जोशी हॉस्पिटल प्रा ली
फलटण


Back to top button
Don`t copy text!