राजे गटाची ताकद संपलेली नाही, सांभाळून रहा : श्रीमंत विश्वजितराजे


स्थैर्य, फलटण, दि. 19 ऑक्टोबर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोळकी येथे झालेल्या राजे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “आमचा सुसंस्कृतपणा आम्हाला नडला आणि काही चाड्या सांगणाऱ्या लोकांमुळे गटाचे नुकसान झाले,” अशी स्पष्ट कबुली देत त्यांनी, “राजे गटाची ताकद संपलेली नाही, सांभाळून रहा,” असा खणखणीत इशाराही दिला.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबद्दल उठलेल्या वावड्यांचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, “रामराजे साहेबांना कोणीही घेत नाही, हे बोलणे साफ चुकीचे आहे. प्रत्येक पक्ष हा बेरजेचे राजकारण करत असतो. ज्यांची केवळ दोन मते आहेत, त्यांचेही पक्षप्रवेश होत असताना, मेळाव्याला जमलेली ही प्रचंड गर्दी त्यांना दिसत नाही का?” नेत्यांच्या वैयक्तिक वादांमुळे पक्षप्रवेश थांबत नसतात, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

गटाच्या नुकसानीबद्दल बोलताना त्यांनी आत्मपरीक्षण केले. “आपला गट थोडा स्वस्थ झाला होता, आता त्याला व्यायामाची गरज होती. आम्ही सर्व जण आता पुन्हा बाहेर पडलो आहोत,” असे सांगत त्यांनी गट पुन्हा सक्रिय झाल्याचे जाहीर केले. काही लोकांमुळेच गटाचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत ते म्हणाले, “ते चाड्या सांगत होते, त्यामुळेच गटाला फटका बसला.”

केवळ हार-तुरे घालणाऱ्या आणि पांढरे कपडे घालून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांवरही त्यांनी टीका केली. “अशी माणसे आपली नाहीतच. आपला सुसंस्कृतपणाच आपल्याला नाडला. जर आम्ही थोडी शिस्त लावली असती आणि माणसे पारखून कामकाज केले असते, तर आज ही वेळ आली नसती,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

राजे गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना त्यांनी सडेतोड उत्तर दिले. “राजे गटाची ताकद संपलेली नाही. आम्ही ८०० वर्षांपूर्वीही होतो आणि ८०० वर्षांनंतरही असणार आहोत. इथे बसलेल्यांचे पूर्वजही तेव्हा होते आणि पुढेही असणार आहेत,” असे सांगत त्यांनी गटाच्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून दिली.

श्रीमंत विश्वजितराजे यांनी आगामी निवडणुकीत बरेच काही बोलणार असल्याचे संकेत देत विरोधकांना सूचक इशारा दिला. “लवकर सांभाळा, तुमची भाषा सांभाळा. तुम्ही म्हातारे झाल्यावर तुमची गाठ आमच्याशीच आहे,” या शब्दांत त्यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या भाषणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारल्याचे दिसून आले.


Back to top button
Don`t copy text!