
दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२१ । सातारा । विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्यपालांनी दोन वेळा निवडणुकीच्या तारखा देवुन सुद्धा महाआघाडी सरकारने निवडणूक घेतली नाही हा राज्यपालांचा आणि घटनेचा अवमान आहे आणि याच एका मुद्द्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागु शकते या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी माझ्या त्यांना शुभेच्छा असल्याचे येथे म्हटलं.
रयत शिक्षण संस्थेच्या सातारा छत्रपती शिवाजी काॅलेजच्या नूतन इमारतीच्या उदघाटनासाठी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे साता-यात आले हाेते. त्यावेळी त्यांच्यासमवेत खासदार श्रीनिवास पाटील आदी उपस्थित हाेते. या कार्यक्रमानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल या वक्तव्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकार स्थिर आहे. जे अस्वस्थ आहेत त्यांच्याकडून अशी विधाने होत आहेत. याआधी सुद्धा अशी विधानं केली गेली. ती महाराष्ट्राने ऐकली त्याचा काही परिणाम झाला नाही. अशी विधाने आम्ही गांभीर्याने घेत नाहीत असा टाेला पवारांनी पाटलांना लगावला.