सातारा पालिकेच्या निवडणूकीसाठी मूळ भाजपची 18 जागांची मागणी

सातार्‍यात काही प्रभागांत दोन्ही जागांची अपेक्षा


स्थैर्य, सातारा, दि. 13 नोव्हेंबर : खासदार- उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे – दोन्ही नेते भाजपमध्ये असल्याने दोघांनी पालिकेची निवडणूक मनोमिलनातून लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तरी दोन्ही नेत्यांपुढे मूळ भाजपच्या जागा मागणीच्या संख्येमुळे पेच निर्माण झाला आहे. मूळ भाजपकडून 10 ते 18 जागापर्यंतची मागणी झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये काही प्रभागांमध्ये एक, तर काहींमध्ये दोन्ही उमेदवार मिळावेत, असा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे.
मूळ भाजप आणि न्यू भाजप असा काही प्रकार सातार्‍यात नाही. आता भाजप म्हणून आम्ही एकच आहोत. सर्वच्या सर्व 50 जागा या भाजपच्या आहेत, त्यास दोन्ही नेत्यांची संमती आहे, असे भाजपच्या एका जुन्या कार्यकर्त्याने नमूद केले. दरम्यान, चर्चेनुसार दहा जागा गेल्या, तर दोन्ही राजांकडे 20-20 असे सूत्र राहतील, अशी मिश्कील टिपणीही त्यांनी केली.सातारा विकास आघाडी (साविआ) आणि नगरविकास आघाडी (नविआ) यांच्यात जागा वाटपाच्या सूत्रात नगराध्यक्षपदासह 22, तर नगराध्यक्षपद सोडून 28 जागा असा खल यापूर्वीझाला होता. त्यावेळी जागा वाटपात मूळ भाजपला नविआ सामावून घेईल, अशी चर्चा होती. सोमवारी भाजपने पालिका निवडणूक लढविणार्‍या सर्वच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर मूळ भाजपचे कार्यकर्ते 10 ते 18 जागांसाठी आग्रही राहिल्याची चर्चा आहे.
पालिकेच्या गत निवडणुकीत मूळ नाजपचे सहा नगरसेवक निवडून आले होते. या नगरसेवकांपैकी काहीजण नंतर हृदयनराजे, तर काहीजण शिवेंद्रसिंहराजेयांचे निकटवर्तीय झाले. यंदाच्या निवडणुकीत सर्वच जागा भाजपच्या चिन्हावर लढवल्या जाणार असल्याने मूळ भाजपच्या अपेक्षा वाढीस लागल्या आहेत. यापैकी काही प्रभागांत दोन्ही जागा, तर काही प्रभागांत एक जागा. लढविण्याची तयारी मूळ भाजपने दर्शवली आहे.

मागणी केलेले प्रभाग..

मूळ भाजपने पक्षाचे वाढलेले प्राबल्य, त्या ठिकाणी गतवेळी केलेले प्रतिनिधित्व तसेच सर्वेक्षणाअंती त्यांना अनुकूल असणार्‍या स्थितीचा विचार करत या जागांची मागणी केल्याचे भाजपमधील जाणकारांकडून सांगण्यात आले. शहरातील प्रभाग क्रमांक दोन, तीन, चार, पाच, सहा, 16, 17, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 या प्रभागांमध्ये एक किंवा दोन जागांवर उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!