भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – मंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२८: भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला दि. १६ जुलै २०२१ रोजी ५० वर्षे पूर्ण होत असून या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम जुलैमध्ये जिल्हा व विभागस्तरावर राबविण्यासाठी कोराना परिस्थितीबाबतचा आढावा घेऊन स्थानिक पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे दिनांक १६ जुलै रोजी राज्यस्तरावरील कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन किंवा प्रत्यक्षरित्या घेण्याबाबत नियोजन करीत असल्याचे श्री.पाटील यांनी सागितले.

राज्यभरातील भूशास्त्र, भूगोल, कृषी विषयांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, जलसुरक्षक, राष्ट्रीय सेवा योजना व नेहरू युवा केंद्र यांचे स्वयंसेवक तसेच महिला बचत गट असे जवळपास एक लाख भूजल वापरकर्त्यांना राज्यातील भूजलाची परिस्थिती, उपलब्धता, पुनर्भरण, गुणवत्ता व भूजलाचे व्यवस्थापन इत्यादी विषयांवर ऑनलाइन उदबोधन करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. यामध्ये यंत्रणेतील सेवानिवृत्त भूवैज्ञानिकांचा सहभाग घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘पाणी’ या विषयावर चित्रकला, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

विविध संवर्गातील भूजल वापरकर्त्यांमध्ये भूजलाबद्दल जाणीव जागृती होण्याच्या दृष्टीने “आओ भूजल जाने” या शृंखलेमध्ये आतापर्यंत १८ वेबिनार घेण्यात आलेले असून ही श्रृंखला पुढेही चालू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे दरमहा करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती देण्याकरीता दर महिन्याला ‘भूजल वार्ता प्रसिद्ध करण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!