दैनिक स्थैर्य । दि. ०३ एप्रिल २०२३ । मुंबई । विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नऊ कोटी कुळांची माता त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांचे ४ एप्रिल १९०६ रोजी भायखळा भाजी मार्केट येथे मंगल परिणय झाले होते त्याच मंगल दिनाचे औचित्य साधून दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ (रजि.) यांच्या विद्यमाने भगवान तांबे यांच्या अध्यक्षतेखाली ४ एप्रिल २०२३ रोजी भायखळा मच्छी मार्केट, भायखळा येथे, सायंकाळी ४:०० ते रात्री १०:०० दरम्यान करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर, मनीषा आनंदराज आंबेडकर व भायखळा विधानसभा, आमदार यामिनी यशवंत जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर प्रसंगी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२५ व्या जयंती निमित्त माता रमाईची लेक पुरस्कार व संविधान चषक पारितोषिक वितरण समारंभाचे ही आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे समाजाप्रती असणारे योगदान सर्व जनमानसास समजावून सांगण्यासाठी सम्यक कोकण कला संस्थेच्या वतीने अध्यक्ष भार्गवदास साळवी, कार्याध्यक्ष भगवान साळवी, चिंतामणी जाधव, उपाध्यक्ष मिनाक्षीताई थोरात, महासचिव राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या उपस्थितीत समाजप्रबोधनात्मक बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले आहे, तरी सदर मंगल प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे जाहीर निमंत्रण भगवान तांबे यांनी दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केले आहे.