स्थैर्य, फलटण, दि. १४ : कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र विचार मंच कोल्हापूर आणि कै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वी राज्यस्तरीय ऑनलाईन अर्थशास्त्र सहकार परिषद दिनांक १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित केली असल्याची माहिती अध्यक्ष शरद शेटे व प्राचार्या सौ. श्रद्धा केतकर यांनी दिली.
कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर २० वर्षानंतर प्रथमच कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र विचार मंचच्या वतीने अर्थशास्त्र सहकार परिषदेचे ऑनलाईन आयोजन केलेले आहे. शनिवार, दि. १६ जानेवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. सौ. शकुंतला काळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अर्थतज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे ”अर्थव्यवस्था कोरोना आधीची व नंतरची” या विषयावर बीजभाषण होणार आहेत. अध्यक्षस्थानी सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर आहेत. शाळा समितीचे अध्यक्ष रवींद्र मराठे, सांगली शिक्षण संस्थेचे कार्यवाह शशिकांत देशपांडे व पुतळाबेन शहा कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. बी. पी. मरजे यांची प्रमुख उपस्थिती आहे.
रविवार दि. १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शोधनिबंधाचे सादरीकरण व इयत्ता बारावी सहकार पुनर्रचित अभ्यासक्रम व मूल्यमापन या विषयावर चर्चासत्र होणार आहे. दुपारी तीन वाजता सांगता समारंभ सांगली विधानसभेचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी सांगली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष जनार्दन लिमये यांचे ‘खरंच कोरोना नंतर अर्थव्यवस्था बदलेल काय?’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी सांगली शिक्षण संस्थेचे संचालक आर्किटेक श्रीराम कुलकर्णी आहेत तर श्री दगडूलाल मर्दा चारीटेबल व रिसर्च फाउंडेशन इचलकरंजीचे विश्वस्थ श्यामसुंदर मर्या., सांगली शिक्षण संस्थेचे कार्यवाह शिरीष गोसावी यांची प्रमुख उपस्थिती आहे. तरी या ऑनलाईन अर्थशास्त्र सहकार परिषदेसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन परिषदेचे स्थानिक कार्याध्यक्ष समीर गोवंडे व विचार मंचचे सचिव प्रा. अनिल निर्मळे यांनी केले आहेत.