दैनिक स्थैर्य । दि. १० सप्टेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील मतदान केंद्रावर रविवार दि. 11 सप्टेंबर रोजी आधार क्रमांक मतदार यादीशी जोडणी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये नाव असलेल्या जास्तीत जास्त मतदारांनी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरामध्ये सहभागी होउन आपले आधार क्रमांकाची मतदार यादीशी जोडणी (लिंक) करुन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी तसेच उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत –शिंदे यांनी केले आहे.
मतदार संघातील मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित असणार आहेत. त्यांचेकडे नमूना नं. 6-ब भरुन देऊन आधार लिंक करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. सातारा जिल्ह्याची मतदार संख्या 25 लाख 72 हजार 780 असून यापैकी 10 लाख 10 हजार 621 मतदारांनी आधार लिंक केले आहे.