दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । सातारा । पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे पहिले कॉलेज, छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना जून १९४७ साली केली. कॉलेजच्या स्थापनेस ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाबरोबरच कॉलेजचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजने महाराष्ट्राच्या सामाजिक ,सांस्कृतिक व राजकीय जीवनामध्ये अनेक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वे दिली आहेत.कॉलेजच्या अमृत महोत्सवी वर्षात कॉलेजमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. ‘ छत्रपती शिवाजी कॉलेज’ हे महाविद्यालयाचे नाव असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष असणारया किल्ले प्रतापगड येथे भेट दिली जाणार आहे. महाराजांच्या पराक्रमातून स्फूर्ती ,चैतन्य व प्रेरणा घेण्यासाठी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा ते किल्ले प्रतापगड मोटार सायकल रॅलीचे आयोजन शनिवार दिनांक १८ जून रोजी करण्यात आले असल्याची माहिती जिमखाना विभागाचे संचालक व अमृत महोत्सवी रॅलीचे समन्वयक प्रा.विक्रमसिंह ननावरे यांनी दिली.ही रॅली प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांचे मार्गदर्शनाने होत असून या रॅलीत महाविद्यालयाचे विद्यार्थी ,प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. छत्रपती शिवाजी कॉलेज येथे शनिवारी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मैदानात रॅलीसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी ,प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहेत. ही रॅली शनिवारी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथून निघणार असून मेढा मार्गे महाबळेश्वर व पुढे प्रतापगड येथे जाईल. प्रतापगड येथे शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून ,तेथील माहिती घेऊन दुपारी 2 वाजता प्रतापगड येथून पुन्हा त्याच मार्गाने परतीचा प्रवास करत सायंकाळी 5 वाजता रॅली परत महाविद्यालयात येणार आहे.