‘राजधानी सातारा सेल्फी महोत्सव’ स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२१ । सातारा । ऐतिहासिक सातारा शहरात उभारण्यात आलेल्या ‘राजधानी सातारा’ या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्यासाठी दररोज गर्दी होत आहे. स्वातंत्रोत्तर भारताचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत असून यानिमित्ताने सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्याची अनोखी स्पर्धा कर्तव्य सोशल ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. ‘राजधानी सातारा सेल्फी महोत्सव’ या अनोख्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे.

हि स्पर्धा एकूण ९ गटांमध्ये होणार असून प्रत्येक गटातील उत्कृष्ट १२ स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. ‘मी सैनिक’ या गटात १२ विजेते काढले जाणार असून या गटात सैन्यदलात कार्यरत असणारे अथवा निवृत्त झालेले नागरिक (महिला / पुरुष) सहभाग घेऊ शकणार आहेत. १३ ते २५ वयोगटातील पुरुष आणि महिलांसाठी ‘आय लव्ह मी’ म्हणजेच स्वतःचा सेल्फी या गटात १२ पुरुष आणि १२ महिलांना पारितोषिक दिले जाणार आहे. मी व माझा मित्र किंवा मैत्रीण (यामध्ये फक्त दोन व्यक्तीचाच सेल्फी असावा) या गटातील विजेत्या १२ स्पर्धकांना आकर्षक बक्षीस मिळणार आहे. १२ वर्षाखालील मुलांचा सेल्फी (केवळ एक मुलगा अथवा एक मुलगी) या गटात उत्कृष्ट २४ स्पर्धकांना बक्षीस मिळणार आहे. जोडीदार (पती- पत्नी) या गटात ४० वर्षाखालील आणि ४० वर्षावरील अशा दोन गटांसाठी २४ बक्षिसे दिली जाणार आहेत.

मी व माझे कुटुंब सेल्फी या गटामध्ये संपूर्ण कुटुंबाचा सेल्फी आवश्यक असून या गटातील उत्कृष्ट २४ स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे. ग्रुप सेल्फी (महिला आणि पुरुष) या गटात २४ बक्षिसे दिली जाणार आहेत. (ग्रुप सेल्फी गटामध्ये सहभागी होताना एका ग्रुपमध्ये १० पेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत). मी आणि माझी आई सेल्फी, मी आणि माझे वडील सेल्फी या गटामध्ये उत्कृष्ट सेल्फीसाठी २४ बक्षिसे दिली जाणार आहेत. २५ वर्षांवरील महिला आणि पुरुष सेल्फी (स्वतःचा सेल्फी) या गटातील उत्कृष्ट २४ स्पर्धकांना गौरविले जाणार आहे. स्पर्धकांनी स्वतःच्या मोबाईलवर सेल्फी काढून (फिल्टर अथवा कोणताही बदल न करता) सदर फोटो स्वतःचे नाव, पत्ता आणि कोणत्या गटातील सेल्फी आहे याचा उल्लेख करून ९१४६१५५६५५ या क्रमांकावर दि. १५ जानेवारी २०२२ पर्यंत पाठवायचा आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस, ट्रॉफी आणि सन्मानपत्र दिले जाणार असून विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. बक्षीस वितरण राजधानी सातारा सेल्फी पॉईंट, पोवई नाका येथे दि. २६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत केले जाणार असून या अनोख्या स्पर्धेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!