स्थैर्य, मुंबई, दि. २५ : श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त, सीएसआयआर – राष्ट्रीय विज्ञान प्रसार आणि माहिती संसाधन संस्था(सीएसआयआर- एनआयएससीएआयआर), पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि विज्ञान भारती यांनी संयुक्तपणे ‘विज्ञानिका’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान साहित्य महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्घाटनपर सत्राचे आभासी मंचावर आयोजन केले. विज्ञान आणि साहित्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे आणि स्वयंपूर्णता, जागतिक कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान संवादाचे विविध पैलू उपयोगात आणण्याच्या धोरणांचे दर्शन घडवणे हा याचा उद्देश असल्याचे सीएसआयआर- एनआयएससीएआयआरच्या संचालक डॉ रंजना अग्रवाल यांनी सहभागी आणि निमंत्रीताशी संवाद साधताना सांगितले. या कार्यक्रमा द्वारे वैज्ञानिक साहित्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ शेखर मांडे यांनी बीज भाषणात सांगितले. सध्याच्या कोविड-19 इन्फोडेमिक आणि बनावट वृत्ताविरोधातल्या लढ्यात विज्ञान प्रसारा चे महत्व त्यांनी अधोरेखित केले. मेघालय आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय या उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अंधश्रद्धा आणि धार्मिक दृष्टीकोन यांच्यातला फरक जाणला पाहिजे, असे ते म्हणाले.
भारतीय प्रादेशिक भाषा मध्ये विज्ञान साहित्य या विषयावरचे सत्र, विज्ञान चित्रपट निर्माते नंदन कुढ्याडी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रादेशिक भाषांमध्ये विज्ञान लोकप्रिय करण्यात विज्ञान अद्भुत कथांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. दंतवैद्य असलेले आणि पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाशी निगडीत असलेले डॉ आशुतोष जावडेकर यांनी मराठीतल्या विज्ञान साहित्य आणि अद्भूत कथा याविषयी विचार मांडले. विज्ञान आणि साहित्य यांची सांगड असावी असे त्यांनी सांगितले. मराठी विज्ञान साहित्य वाचकांच्या मोजमापासाठी, आकडेवारीनुसार विश्लेषणाचा अभाव असल्याचे ते म्हणाले.
भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पारंपारिक कला आणि कलाकार मेळा ,आंतरराष्ट्रीय विज्ञान साहित्य उत्सव- वैज्ञानिक, भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव नव तंत्रज्ञानाचे दर्शन घडवणारा कार्यक्रम इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 22 डिसेंबर पासून सुरु झालेला हा सहावा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आहे.