दैनिक स्थैर्य । दि.३० एप्रिल २०२२ । मुंबई । कोविड महामारी, महापूर, चक्रीवादळे अशा विविध आपत्तींना तोंड देत राज्य शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देणाऱ्या सचित्र प्रदर्शनाचे मुंबई आणि मुंबई उपनगरसह राज्याच्या सर्व विभागीयस्तरावर आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या प्रदर्शनांचे उद्या दि.1 मे रोजी उद्घाटन होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने विविध विकासकामे केली असून कोरोना महामारी आणि अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. राज्य शासनाने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी विविध योजना राबविल्या असून या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, या उद्देशाने राज्यातील विविध ठिकाणी ही प्रदर्शने आयोजित केली आहेत. मुंबईतील वरळी सी-फेस येथे कॉमन मॅन पुतळा परिसरात आणि रमाडा हॉटेल मागील जुहू बीच येथे प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत.
दि. 1 ते 5 मे, 2022 या कालावधीत 5 दिवस ही प्रदर्शने सर्वसामान्यांसाठी दिवसभर खुली राहणार आहेत.
‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या मोहिमेअंतर्गत आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते वरळी सी फेस येथे तर मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जुहू बीच येथे होणार आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर सह ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अमरावती आणि नागपूर येथे याच कालावधीत या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले असून संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या हस्ते या प्रदर्शनांचे उद्घाटन होणार आहे.
शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची सचित्र माहिती असलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी केले आहे.