
दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२२ । सातारा । राष्ट्रीय सेवा योजना औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सातारा व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे उपप्राचार्य संजय मांगलेकर, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मिलिंद उपाध्ये आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी जगन्नाथ देटके यांचे हस्ते झाले.
या रक्तदान शिबिरासाठी 200 पेक्षा जास्त दात्यानी नोंदणी केली होती, वैद्यकीय तपासणी करून त्यानंतर सुमारे 100 प्रशिक्षणार्थी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच इच्छुक रक्तदात्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यानंतर निवडक मुलांचेच रक्त यावेळी घेण्यात आले. या रक्तदात्याना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
यावेळी सुमारे 100 रक्तपिशव्या रक्तदान झाल्याने सिव्हिल रुग्णालयाचे डॉ. थोरात आणि डॉ. बुंबे यांनी समाधान व्यक्त करून आभार व्यक्त केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी व निदेशक ही लोखंडाशी निगडीत यंत्रसामुग्री व हत्यारे वापरुन प्रशिक्षण घेत असलेने त्यांना धनुर्वाताचे इंजेक्शन्स घेणे आवश्यक आहे. त्यानुसार पुढील शिबिर हे धनुर्वात इंजेक्शन चे घेऊन सर्वाना धनुर्वाताचे इंजेक्शन्स देण्याचे आश्वासन दिले. असेच या संस्थेत मुलींची संख्याही जास्त असलेने मुलींची वैद्यकीय तपासणी व समुपदेशन विषयक कार्यक्रम ही आयोजित करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले.
यापुढे ही वारंवार रक्तदान शिबिर आयोजित करुन वार्षिक 500 रक्तदानाचा संकल्प करण्यात आला. शिबिराचे नियोजन दशरथ महानवर, विजय कुमार शिंदे आणि जगन्नाथ देटके यांनी केले.