नोव्हेंबरमध्ये दोन दिवसीय ‘मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे’ आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, २०१० अंतर्गत राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताहानिमित्त येत्या नोव्हेंबर महिन्यात दोन दिवसीय मुंबई शहर ग्रंथोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी प्राथमिक आढावा बैठक घेतली.

मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सव २०२२ साठी जिल्हा समन्वय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, शिक्षण उपनिरीक्षक रंजना राव, मनपा शिक्षक ग्रंथालयांच्या ग्रंथपाल साधना कुदळे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे प्रतिनिधी अशोक मुळे, बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रमोद खानोलकर, प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे, कार्यवाह सुनिल कुबल, कार्यवाह उमा नाबर आदी उपस्थित होते.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या महोत्सवात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथ दिंडी, चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यान असे दर्जेदार, प्रबोधनात्मक, मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच साहित्य जगतातील लेखक, साहित्यिकांच्या ग्रंथसंपदासाठी स्टॅाल उभारले जाणार आहेत. वाचनप्रेमींसाठी ही ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध असणार आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

 “आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात वाचन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. विशेषत: लहान शाळकरी मुलामुलींमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याची आवश्यकता आहे. ई-बुक सुविधाही आता उपलब्ध झाली आहे. काळानुरूप बदलले पाहिजे. प्रत्येकाचे वाचन वाढले पाहिजे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेऊन लोकसहभाग वाढवावा. ग्रंथोत्सव हा लोकोत्सव व्हावा, अशा सूचना उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी बैठकीत दिल्या.


Back to top button
Don`t copy text!