दैनिक स्थैर्य | दि. ४ मे २०२३ | फलटण |
श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर-राजेसाहेब यांची ४५ वी पुण्यतिथी व श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांची ९८ वी जयंती यानिमित्त रविवार, दि. १४ मे २०२३ ते गुरुवार, दि. २५ मे २०२३ या कालावधीत ‘स्मृती महोत्सव २०२३’ साजरा करीत आहोत.
या स्मृती महोत्सवाचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे : रविवार, दि. १४ मे रोजी स्मृती महोत्सव उद्घाटन समारंभ व श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार वितरण समारंभ होईल. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते स्मृती महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तसेच त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक व आयुक्त, केंद्रीय माहिती आयोग श्री. उदय माहूरकर यांना ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
सोमवार, १५ मे रोजी पराग माटेगावकर प्रस्तुत ‘सांज सरगम’ हा हिंदी व मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम होईल. यावेळी गायिका सुवर्णा माटेगावकर, संदीप उबाळे, श्रुती देवस्थळी व सहकलाकार, पुणे हे आपले गायन सादर करतील.
मंगळवार, १६ मे रोजी ‘नफ्याच्या शेतीतून पर्जन्य नियमन’ या विषयावर हवामान तज्ज्ञ डॉ. बी.एन. शिंदे व्याख्यान देतील. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमंत रामराजे भूषविणार आहेत.
बुधवार, १७ मे रोजी सांगलीचे हिंमत पाटील कथाकथन करतील. अध्यक्षस्थानी प्रा. शरद इनामदार असतील.
गुरुवार, १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई हे ‘अफगाणिस्तान, पाकिस्तान व जागतिक शांतता’ या विषयावर व्याख्यान देतील. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता असणार आहेत.
शुक्रवार, १९ मे रोजी सुप्रसिध्द लेखक, पुरातत्त्व अभ्यासक आशुतोष पाटील ‘तुमचा आमचा इतिहास व पुरातत्त्व’ या विषयावर व्याख्यान देतील. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य विश्वासराव देशमुख असणार आहेत.
शनिवार, २० मे रोजी एकपात्री कलाकार, वक्त्या प्रा.डॉ. प्रतिभा जाधव या ‘मी अरुणा बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर करतील.
बुधवार, २४ मे रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांतील विद्यार्थी कलावंत ‘कलाविष्कार’ हा कार्यक्रम सादर करतील.
गुरुवार, २५ मे रोजी स्मृती महोत्सव समारोप समारंभ, बक्षीस वितरण व सत्कार समारंभ होईल. तसेच विद्यार्थी कलावंत ‘कलाविष्कार’ कार्यक्रम करतील. या कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर भूषविणार आहेत.
हे सर्व कार्यक्रम मुधोजी हायस्कूल रंगमंच, फलटण येथे सायंकाळी ६.०० वाजता सुरू होतील.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ फलटणकरांनी घ्यावा, असे आवाहन श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व सचिव प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनी केले आहे.