दैनिक स्थैर्य । दि. १७ डिसेंबर २०२२ । सातारा । येथील भारती फाऊंडेशनच्यावतीने ‘कलाकारी-२’ महोत्सव रविवार, दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत शाहु उद्यान, गुरुवार बाग येथे होणार असल्याचे माहिती निमंत्रक रवींद्र भारती – झुटिंग आणि महेश लोहार यांनी दिली.
शाहूनगरीच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देण्याच्या उद्देशाने रंग, माती, शब्द व सुरांचा आविष्कार असलेल्या ‘कलाकारी’ या कला महोत्सवाची संकल्पना भारती फाऊंडेशनचे रविंद्र भारती- झुटिंग यांनी मांडली. या महोत्सवाचे पहिले पुष्प या वर्षी एप्रिलमध्ये सादर करून ही संकल्पना सत्यात उतरवण्यात आली. याला सातारकर कलाकारांचा व कलारसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या महोत्सवाचे दुसरे पुष्प रविवार, दि. १८ रोजी गुंफण्यात येणार आहे. यावेळी महोत्सवात शिल्पकला, पोर्ट्रेट पेंटिंग, पेसिक पेंटिंग, रचना चित्र, पॉटरी, रांगोळी, वादन, लॅण्डस्केप पेंटिंग, गायन, नृत्य, ओरिगामी, कॅलिग्राफी इत्यादी कलाविष्कार सादर होणार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने शाहूनगरवासीयांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकारांच्या कलांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे, या महोत्सवाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार व साताज्याचे सुपुत्र प्रमोद कुर्लेकर, आणि अमित ढाणे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात ‘कलागौरव पुरस्कार २०२२’ कराडचे ज्येष्ठ चित्रकार बाबा पवार यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी सातारकर कलारसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रविंद्र भारती- झुटिंग आणि महेश लोहार यांनी केले आहे. महोत्सव यशस्वी करण्यासाठी टीम कलाकारी, हरी ओम ग्रुप व अश्वमेधचे सदस्य परिश्रम घेत आहेत.