
दैनिक स्थैर्य । दि. १८ जानेवारी २०२३ । सातारा । रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मार्गस्त केले.
या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्यासह पोलीस अधीक्षक कार्यालय, शहर वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करुन पोलीस अधीक्षक श्री. शेख म्हणाले, या निमित्ताने लोकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती निर्माण होत आहे. तसेच वेगवेगळ्या नियमांविषयी लोकांपर्यंत माहिती पोहचविण्यात येत आहे. ती समजून घ्यावी आणि वाहतूक नियमांचे पालन करावे.
पोलीस अधीक्षक कार्यालयापासून सुरु झालेली ही रॅली पोवई नाका-महाराजा सयाजीराव हायस्कूल-नगर पालिका- मोती चौक-राजवाडा-गोल बाग-मोती चौक- पोलीस अधीक्षक कार्यालय-पोवई नाका-गोडोलीनाका- अंजठा चौक-बाम्बे रेस्टॉरंट चौक-बांधकाम भवन चौक मार्गे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे समाप्त झाली.