दैनिक स्थैर्य । दि. १३ सप्टेंबर २०२२ । सातारा । दि. 15 सप्टेंबर 2022 रोजी अभियंता दिनी जलशक्ती अभियान कॅच द रेन व जलसाक्षरता अभियानांतर्गत मेजर अतुल गर्जे सभागृह, सैनिक स्कूल सातारा येथे पाण्याचे जतन करणे, नदी नाले, धरणामधील पाण्याचे प्रदुषण रोखणे पाणी वापर संस्थेचे सक्ष्मीकरण करणे व जलसंधारण या विषयासंदर्भातील जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करण्याता आले आहे.
या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे व जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद इत्यादी नामवंत संस्थांकडील व्याख्याते तसेच पाण्याचे जतन, संवर्धन इत्यादी क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते इ. मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. ही कार्यशाळा सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी सातारा, मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा, अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ तसेच जलसंपदा, महसूल जलसंधारण, कृषी व वन विभागाच्या निमंत्रित जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत उद्घाटनाने सुरुवात होऊन सायं. 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेली आहेत.
यामध्ये वाल्मी औरंगाबादचे सेवानिवृत्त व्याख्याते बी. एम. शेटे यांचे पाणी वापर संस्थेची ओळख, संस्थेची स्थापना व दैनंदिन कामकाज तसेच सहकार कायदा 1960 मधून म. सि. प. शे. व्य.2005 कायद्यानुसार पाणी वापर संस्थेचे रुपांतरण, गरज, फायदे व कार्यपध्दती या विषयी तर जलयोध्दा (यशदा) नाशिकचे गोवर्धन कुलकर्णी यांचे पाणी वापर संस्थेचे सक्षमीकरण या विषयावरील व जलयोध्दा (यशदा) कोल्हापूरचे उदय गायकवाड यांचे जलाशय व नदी नाल्यांचे प्रदुषण : शासकीय अधिकाऱ्यांचे अधिकार व जनसामान्यांची जबाबदारी या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आली आहेत.
ही व्याख्याने सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक पवार, यशदा, पुणेचे जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहेत. तरी या कार्यशाळेस निमंत्रितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डाईफोडे यांनी केले आहे.