
दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑगस्ट २०२२ । सातारा । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून व संयोजनातून प्रत्येक जिल्ह्यात एकुण 75 अमृत सरोवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 85 अमृत सरोवराची कामे निवडली आहेत. ही कामे 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
या 85 कामांपैकी 14 कामे पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये खटाव तालुक्यातील आवारवाडी/विसापूर, मांजरवाडी, येळीव, कोरेगाव तालुक्यातील भांडारमाची/चिमणगाव, राऊतवाडी, नागेवाडी/भाडळे, माण तालुक्यातील मोही, आंधळी, फलटण तालुक्यातील मानेवाडी, तरडफ, वेळोशी, वाखरी, कुरवली बु., नांदल/मुळीकवाडी ही आहेत.
दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी अमृत सरोवर स्थळी स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे परिवारातील सदस्य, शहीद जवानांच्या परिवारातील सदस्यांद्वारे, स्थानिक पदम अवार्ड प्राप्त व्यक्तीकडून ध्वजारोहणाबरोबर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. अमृत सरोवरस्थळी होणा-या कार्यक्रामामध्ये लोकप्रतिनिधी, महिला-पुरूष,तरूण युवक-युवती तसेच शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थींनी आधिकाधिक प्रमाणात सहभागी होवून जलसंधारणाद्वारे ग्रामीण भागाचा विकास करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.