शिवराज्याभिषेक दिनी (दि.६ जून) बियाणे महोत्सव आयोजित करा – बच्चू कडू यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.११ मे २०२२ । सातारा । जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे घरीच तयार केल्याने जिल्ह्या सोयाबीन बियाण्यांबाबत स्वयंपूर्ण झाला आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेले हे बियाणे अन्य शेतकऱ्यांपर्यंत स्वस्तात पोहोचावे; या उद्देशाने येत्या 6 जून रोजी (शिवराज्याभिषेक दिन) प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बियाणे महोत्सव आयोजित करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

येथील जिल्हा नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात सन 2022-23 च्या खरीप हंगाम नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. प्रकाश भारसाकळे, आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उपवनसंरक्षक के.आर. अर्जूना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी व शेतकरीही उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी डॉ. कांताप्पा खोत यांनी मागील सभेचे इतिवृत्त व खरीप हंगामाचे नियोजन सादर केले. पालकमंत्री कडू म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मेहनतीने जिल्ह्यातील सर्वाधिक पेरणी होणारे सोयाबीन पिकाचे बियाणे घरच्या घरी तयार केले आहे. त्यासाठी त्यांना कृषी विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले आहे. शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी तयार केलेले हे बियाणे, अन्य शेतकऱ्यांना रास्त दरात मिळावे, यासाठी शिवराज्यभिषेक दिन दि.6 जून रोजी बियाणे महोत्सवाचे आयोजन करावे. ते म्हणाले की, जिल्ह्यात जैविक ; सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, जमिनीची उत्पादकता वाढावी, विषमुक्त अन्न मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी ‘शेताच्या बांधावर प्रयोगशाळा’ हा उपक्रम राबविण्याबाबत त्यांनी यंत्रणेस निर्देशित केले. त्याअनुषंगाने फार्म लॅब पुणे यांच्या मार्फत डॉ. चव्हाण यांनी सादरीकरण केले.

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, लोकांना रासायनिक शेतीकडून सेंद्रिय वा जैविक शेतीकडे वळण्यास उद्युक्त करण्यासाठी समर्थ पर्याय द्यावा लागेल. त्यासाठी हे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांनी हवामानाचा नेमका अंदाज घ्यावा. तसेच कृषी विभागामार्फत पेरणी करण्याबाबत केलेल्या शिफारसी ध्यानात घेऊन त्या वेळापत्रकाचे पालन करावे,असे आवाहन पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले.

याच बैठकीत खरीप हंगाम 2021 मध्ये बीजप्रक्रिया स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. त्यात अंजली वैभव देशमुख रा. भांबेरी ता. तेल्हारा, नागोराव जनार्दन ताले रा. दिग्रस खु. ता. पातुर, राम माणिकराव फाळे रा. तामसी ता. बाळापूर या शेतकऱ्यांचा समावेश होता.

सन 2022-23 च्या खरीप पेरणी हंगामाच्या नियोजनातील महत्त्वाचे मुद्देः-

दृष्टीक्षेपात अकोला जिल्हाः-अकोला जिल्हा एकूण भौगोलिक क्षेत्र-5 लक्ष 42 हजार 700 हेक्टर. त्यापैकी खरीप पिकाखाली 4 लक्ष 83 हजार 291 हेक्टर असून रब्बी पिकाखाली 1 लाख 7 हजार 952 हेक्टर इतके क्षेत्र आहे.

खरीप पेरणीचे नियोजनः-जिल्ह्यात सन 2022-23 या खरीप हंगामासाठी 4 लक्ष 83 हजार 500 हेक्टर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे. सोयाबीन 2 लक्ष 20 हजार हेक्टर, कापूस 1 लक्ष 60 हजार हेक्टर, तुर 55 हजार हेक्टर, मुग 23 हजार तर उडीद 16 हजार हेक्टर.

बियाणे उपलब्धताः- नियोजित क्षेत्रावरील पेरणीसाठी एकूण 1 लक्ष 74 हजार 145 क्विंटल बियाणे मागणी केले असून महाबीज व एनएससी कडून 23 हजार 773 क्विंटल तर खाजगी कंपनीकडून 39 हजार 121 क्विंटल नियोजन आहे.

घरगुती सोयाबीन बियाणे 3 लक्ष 4 हजार 372 क्विंटल शेतकऱ्यांकडे उपलब्ध असून शेतकऱ्याकडील बियाणे वापरावर भर देण्यात येणार असून बियाणे टंचाई भासणार नाही. त्यासाठी शेतकऱ्याकडील बीज विक्री महोत्सव हा राज्यातला पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 7 दिवस प्रत्येक तालुक्यात राबविला जाणार आहे.

खतांची उपलब्धताः-रासायनिक खत 86 हजार 310 मे टन आवंटन मंजूर आहे. मागील वर्षीचा शिल्लक साठा 21 हजार 734 मे टन असून एप्रिल महिन्यात 3 हजार 635 मे टन तर मे महिन्यात 900 मे टन साठा प्राप्त असून एकूण उपलब्ध साठा 25 हजार 793 मे टन आहे. युरिया 1 हजार 350 मे टन संरक्षित साठा मंजूर असून 1 हजार 250 मे टन साध्य आहे तर डीएपी 1 हजार 460 मे टन संरक्षित साठा मंजूर असून 900 मे टन साध्य आहे. मे महिन्यात जास्तीत जास्त साठा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. खत टंचाई होणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे.

थेट बांधावर खत पुरवठाः- गत वर्षी 333 शेतकरी गटांमार्फत 13,309 शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधावर खते पोहोचविण्यात आली. 3541.23 मे.टन इतक्या खताचा थेट बांधावर पुरवठा करण्यात आला.

भेसळ काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकेः- बियाणे व खतबाबत काळाबाजार, भेसळ, जास्त भावाने विक्री, लिंकींग रोखण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथक सज्ज.

‘विकेल ते पिकेल’वर विशेष भरः- ‘विकेल ते पिकेल’, अंतर्गत बाजारात मागणी असलेल्या नवीन पिके उदा. तीळ, आंबा, जवस, करडई, भुईमुग ई. पिकावर विशेष भर देण्यात येणार आहे.

पिककर्जः- पिककर्ज खरीप करीता 1370 कोटी रुपयांचा लक्षांक असून आतापर्यंत 383 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. पिककर्ज वाटपासाठी गावागावात बैठका घेऊन नियोजन करण्यात आले आहे.

ठिबक व तुषार सिंचनास चालनाः- सिंचनाखालील क्षेत्र वाढविणेसाठी ड्रीप व स्प्रिंकलरचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

पिकविमा :- अकोला जिल्ह्यात खरीप 2021 मध्ये 2 लक्ष 79 हजार 952 शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होते. शेतकरी हिस्सा 16.94 कोटी रुपये, राज्य हिस्सा 58.71 कोटी रुपये तर केंद्र हिस्सा 58.71 कोटी रुपये असे एकूण 134.37 कोटी रुपये विमा हप्ता भरले होते. मिड सीजन लागू करून 33 महसूल मंडळाला 75.58 कोटी रू. लाभ दिला आहे. तसेच वैयक्तिक तक्रार घेवून 10.68 कोटी, काढणी पश्चात नुकसान भरपाई 0.68 कोटी तर पिक कापणी प्रयोगानुसार 62.68 कोटी असे एकूण 149.61 कोटी मदत वाटप झाली आहे. एकूण विमा हप्ता 134.37 कोटी भरले असतांना 149.61 कोटी मिळाला आहे.

नैसर्गिक आपत्ती मदत:- माहे जुलै 2021 महिन्यात झालेल्या नुकसानीसाठी 123.61 कोटी रू. निधी आवश्यक असतांना 123.56 कोटी रू. निधी प्राप्त झाला आहे. माहे ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 कालावधीत झालेल्या नुकसानासाठी 5.89 कोटी रू. निधी आवश्यक असतांना 3.72 कोटी रू. प्राप्त झाला आहे. तर ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये झालेल्या नुकसानासाठी रू. 45.82 कोटी आवश्यक असतांना निधी अप्राप्त आहे. असे एकूण 174.34 कोटी रू. निधी आवश्यक असतांना 127.28 कोटी रू. प्राप्त आहे तर 47.06 कोटी रू. निधी प्रलंबित असून त्वरीत पाठपुरावा सुरुआहे.

उत्पादन वाढीसाठी शेतीशाळाः- उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी 652 शेतीशाळा घेण्याचे नियोजन असून त्यात 117 महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळा घेण्यात येणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!