‘मिहान’मध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्ली व मुंबई येथे उद्योग संमेलनाचे आयोजन करा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नागपूर, दि.१५: विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प हा पाठपुराव्याच्या उदासीनतेमुळे मागे राहता कामा नये. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबई येथे ‘ॲडव्हान्टेज विदर्भ’च्या धर्तीवर गुंतवणूक संमेलनाचे आयोजन करा. सागरी किनारपट्टीशिवाय यशस्वी झालेल्या अशा प्रकल्पांचा अभ्यास करून तसे पर्याय सूचवा, मिहानसाठी आवश्यक असणाऱ्या 133 केव्ही केंद्राच्या जागेचा प्रश्न पुढील दहा दिवसात निकाली काढण्याचे आदेश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे दिले.

मिहान येथे आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भेट दिली. या प्रकल्पाअंतर्गत गुंतवणूक क्षेत्रात सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महाराष्ट्र विमानतळ विकास तांत्रिक कंपनीचे (एमएडीसी) तांत्रिक सल्लागार सुभाष चहांदे, मुख्य अभियंता एस. के. चॅटर्जी, मार्केटिंग मॅनेजर योगेश धारकर, जनसंपर्क अधिकारी दिपक जोशी, नागपूर विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबीद रूही, विद्युत सल्लागार केशवराव इंगोले, मिहान एसईझेडचे विशेष अधिकारी दिनेश नानल, दीपक कुमार, श्री. भंडारी, मिहान इंडस्ट्रियल असोसिएशनचे मनोहर भोजवानी, ऊर्जा विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

आढावा बैठकीत मिहान प्रकल्प गतिशील करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी हैदराबाद, मुंब्रा, इंदोर, विशाखापट्टणम व भारतात ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रोजेक्ट उभे राहिले आहेत. त्या ठिकाणी केलेल्या उपाययोजना मिहानमध्ये सुरू करण्यासाठी अभ्यास गटांचे गठण करा. प्रकल्पाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे आवश्यक विषयांवर बैठक लावण्यात यावी. या बैठकीमध्ये लघु व मध्यम प्रकल्पातील उद्योगांना आकर्षित करण्यासाठीचे नवीन धोरण ठरवण्यात यावे, लघु उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना जागा देणे, कौशल्य विकास व प्रशिक्षण, नाईट पार्किंग, आंतरराष्ट्रीय विमान सेवा, ऑटोमोबाईल्स, लॉजिस्टीक क्षेत्रातील गुंतवणूक वाढ, आदी विषयांवर धोरण ठरवता येईल. अनेक उद्योग संस्थांना नागपूर हा पर्याय ठरू शकतो. त्यामुळे उद्योग जगतातील मान्यवरांचे ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ किंवा विदर्भात गुंतवणुकीची संधी अशा आशयाचे गुंतवणूक संमेलन नवी दिल्ली व मुंबई येथे आयोजित करण्यात यावे. जेणेकरून मिहानमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या शहरातील उद्योग समूहांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना या प्रकल्पाबाबतची माहिती मिळेल. मात्र हे संमेलन घेण्यापूर्वी मिहान येथे गुंतवणूक करणाऱ्यांना कोणत्या सवलती दिल्या जातील, याची आश्वासक तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मिहानसारखा प्रकल्प हा विदर्भातील सर्वपक्षीय नेत्यांच्या पसंतीचा प्रकल्प असून यासाठी प्रसंगी आपण सर्वांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले. पुढील काही दिवसात मी यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व उद्योजकांची चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिलायन्स उद्योग समूह आणि परिसरातील प्रकल्प सुरू करण्याबाबत एक सकारात्मक पाऊल उचलावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.

या बैठकीमध्ये त्यांनी कॉर्गो क्षेत्राचा विमानतळाशी संपर्क वाढावा यासाठी चार पदरी रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले. तसेच बुटीबोरीला जोडण्यासाठी रेल्वे लाईनला समांतर आणखी एक फोर लेन मार्गिका निर्माण करण्याबाबतच्या सूचना दिल्या. डाटाएन्ट्री इंडस्ट्रीला कायमस्वरूपी वीज पुरवठा देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे ही त्यांनी सांगितले. तीन गावातील पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्याबाबतची सूचना त्यांनी दिली. यासाठी पुनर्वसनाच्या संदर्भातील नवीन निकषाचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. प्रकल्पाच्या सभोवताली असणाऱ्या कंपाउंड वॉलची डागडुजी व प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मागण्यांसाठी चर्चा करण्याचे सांगितले. विमानतळांवरील आंतरराष्ट्रीय सेवा, नाईट पार्किंग व अपेक्षित असणाऱ्या देशातील उड्डान सेवा या संदर्भात विविध स्तरावर पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी उद्योग समूहातील काही अडचणी देखील बैठकीत पुढे आल्या. यामध्ये झेजमध्ये (विशेष आर्थिक क्षेत्रात) उद्योग व्यवसाय असल्यामुळे तांदूळ, डाळ, मसाले उत्पादकांना निर्यातीचे बंधन घालण्यात आले असून या धोरणात काही बदल झाल्यास मिहानमध्ये स्थानिक पिकांवर आधारित असणारा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकतो. त्यासाठी काही सवलती मिळतात का याची चाचपणी करण्याबाबतची विनंती पालकमंत्र्यांना करण्यात आली. हा धोरणात्मक बदल असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मिहानमध्ये उद्योग समूह वाढविण्यासाठी जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील विविध शहराच्या व्यापारी संघटनांशी बोलणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. समृद्धी महामार्ग सोबत मिहान प्रकल्पाला जोडले जाणार आहे. जवाहरलाल नेहरू सागरी पोर्ट सारख्या संस्थांना पूरक उद्योग व यंत्रणा उभारण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. मिहान संदर्भात दर पंधरा दिवसानंतर पाठपुरावा बैठक लावण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.


Back to top button
Don`t copy text!