
दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । फलटण । महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई पुरस्कृत, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा आयोजित व श्रीराम एज्युकेशन सोसायटी आणि सद्गुरु प्रतिष्ठान, फलटण यांच्यावतीने दिनांक 25 व 26 नोव्हेंबर 2022 रोजी फलटणमध्ये दोन दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. यंदाच्या संमेलनाचे हे 10 वे वर्षं असून या दशकपूर्तीच्या व भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तथा जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ व फलटण म.सा.प.शाखेचे अध्यक्ष शांताराम आवटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या निबंध स्पर्धा खुल्या गटांमध्ये होणार असून निबंध पाठविण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे. स्पर्धेतील निबंधाचे विषय पुढील प्रमाणे-
1) भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये साहित्यिकांचे योगदान.
2) स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या नंतरचा महाराष्ट्र.
3) साहित्य प्रेमी यशवंतराव.
4)प्रसार माध्यमे समाजप्रबोधनात कमी पडत आहेत काय?
स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिसाचे स्वरूप प्रथम क्रमांक रोख रक्कम रुपये 3,001/- द्वितीय क्रमांक रुपये 2,001/- तृतीय क्रमांक रुपये 1,501/- व सन्मानपत्रक , ग्रंथभेट असे आहे. विजेत्या स्पर्धकांना बक्षीसाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते दिनांक 25 व 26 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित स्व.यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनामध्ये करण्यात येणार आहे.
निबंधाकरिता 1 हजार शब्द मर्यादा आहे. निबंध मराठी भाषेत स्वतःच्या स्वच्छ हस्ताक्षरामध्ये किंवा टाईप (पी.डी.एफ.) स्वरुपात [email protected] या ई – मेल वर किंवा मा.अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा, द्वारा साप्ताहिक लोकजागर कार्यालय, सिद्धीविनायक चेंबर्स, 322 कसबा पेठ, शंकर मार्केट, फलटण ता.फलटण जि.सातारा येथे दि.25 ऑक्टोबर 2022 पर्यंत पाठवावेत. निबंधासोबत स्पर्धकाने स्वत:चे संपूर्ण नाव, पत्ता व संपर्क क्रमांक नमूद करावा. स्पर्धकाचा निबंध स्वरचित असावा. निबंधातील मजकूर एखाद्या वेबसाईट वा इतरांच्या लेखन सामुग्रीवरून कॉपी पेस्ट नसावा. तसे आढळून आल्यास तो निबंध स्पर्धेतून बाद ठरविण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले असून स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.