दैनिक स्थैर्य । दि. ११ फेब्रुवारी २०२३ । सातारा । लोकांच्या कामासाठी सरकार काम करत आहे. सातबारा, रेशन कार्ड यासह इतर दाखले लोकांना मिळणे सोपे व्हावे यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. खंडाळा तालुक्यातील विंग येथे आयोजित महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्यादारी या शिबिरास पालकमंत्री श्री. देसाई यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खंडाळा तहसीलदार दशरथ काळे, विंगचे सरपंच पुनम तळेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते. सर्व सामान्य लोकांना जागेवर न्याय मिळाला पाहिजे असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, सर्व सामान्य माणसाला त्याच्या नियमित असणाऱ्या कामासाठी हेलपाटे घालायला लागू नयेत अशा पद्धतीचे काम आपल्याला करायचे आहे. सामान्य माणसाच्या दरात शासन गेलं पाहिजे. शासन हे सर्व सामान्य जनतेसाठी आहे. अशा प्रकारचे लोकाभिमूख काम जिल्ह्यात निश्चितच केले जाईल. सर्व सामान्य जनतेसाठी राबवण्यात येणारे असे उपक्रम प्राधान्याने राबवण्यात यावेत, यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. या शिबिराच्या माध्यमातून नक्कीच जनतेचे प्रश्न सोडवले जातील, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
महाराजस्व अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या शासन आपल्या दरी या शिबिराचे खंडाळा तालुक्यातील विंग येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शासनाच्या महसूल, आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत, पाणी पुरवठा, भूमिअभिलेख या सह दैनंदिन व्यवहारामध्ये सबंध येणाऱ्या व तालुकास्तरावरील मिळणाऱ्या दाखल्यांविषयीचे लोकांचे कामकाज करण्यात आले.